वैभववाडी : गोवा ते मुंबई जाणाऱ्या इसार एस्प्रेसची धडक बसून विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, रा. नाधवडे, हेळकरवाडी, सध्या रा. मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी८.३० वा. च्या सुमारास घडली.
याबाबत रेल्वे पोलिस प्रवीण राजाराम मोरे (४७) यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी सकाळी ड्युटीवर असताना खारेपाटण स्टेशन मास्तर यांनी रेल्वे अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर प्रवीण मोरे व त्याचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, रेल्वे ट्रॅकवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने वैभववाडी पोलिसांना माहिती दिली.
पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलिस कर्मचारी उद्धव साबळे व धनाजी धडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहापासून काही अंतरावर सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता, मृत व्यक्ती अमोल खांडेकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्या मेहुण्यांना मृतदेहाचे छायाचित्र पाठविल्यानंतर त्यांनीही ओळख पटवली. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.
अमोल खांडेकर हे मुंबई येथे टाटा कन्सल्टंन्सीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नी मेडिकल क्षेत्रात कार्यरत असून शनिवारी रात्री मुंबईवरून त्या मुलाखतीसाठी विमानाने बंगळुरूकडे रवाना झाल्या होत्या. तर अमोल हे कोकण कन्या एस्प्रेसने आपल्या मूळ गावी नाधवडे येथे येत होते.
यंदाच्या पावसाळ्यात काजू लागवड करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी जमिनीची साफसफाई करण्यासाठी त्यांनी जेसीबीही बोलावली होती. रविवारी सकाळी वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर ते नाधवडे हेळकरवाडीच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून पायी जात होते. त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्स्प्रेसची त्यांना जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी ते मोबाईलवर बोलत असावेत, त्यामुळे ट्रेनचा आवाज त्यांच्या लक्षात आला नसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे नाधवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.