मायनिंग प्रकल्प सर्व्हे विरोधात आजगावात जनआंदोलन 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मायनिंग प्रकल्प सर्व्हे विरोधात आजगावात जनआंदोलन

सर्व्हे विनापरवाना असल्याचा आरोप; तातडीने बंद करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : आजगाव दशक्रोशीमध्ये प्रस्तावित जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण करण्यास आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखत सर्व्हे बंद पाडला. सोमवारी सायंकाळी ग्रामदैवत वेतोबा मंदिरामध्ये याविरोधात दहाही गावच्या ग्रामस्थांनी सरपंचांच्या उपस्थितीत जनआंदोलन छेडत हा सर्व्हे बेकायदेशीर असून कंपनीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने तो तातडीने बंद करण्याची मागणी केली.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या मायनिंग प्रकल्पाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सोमवारी आजगाव गावात दाखल झाले. त्यांनी दशक्रोशयीतील एकाही ग्रामपंचायतीला कल्पना न देता परस्पर ड्रोन उडवून सर्व्हे सुरू केला. मळेवाड गावात ड्रोन उडत असल्याची कल्पना सरपंचांना येताच त्यांनी े कंपनीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत हा सर्व्हे बंद केला. त्यांनतर पुन्हा दुपारी ३.३० वा. ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. यावेळी आजगाव वेतोबा मंदिरात वेळी हा ड्रोन गावात उडताना दिसून आला. ग्रामस्थांनी या सर्व्हेला तीव्र विरोध दर्शवला. हा सर्व्हे चुकीचा व बेकायदेशीर असल्याचे सांगत बैठकीस उपस्थित नागरिकांनी जनआंदोलन छेडले. या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, माजी आ. वैभव नाईक, उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, आरोंदा गटाचे जि. प .सदस्य सुदन कवठणकर, ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख संतोष गोवेकर, शेखर आजगावकर, ॲड. स्वप्नील आजगावकर व कार्यकर्ते उपस्थित होते. जेएसडब्लू मायनिंग लॉबीचे प्रस्थ दहा गावांमध्ये वाढत आहे. मायनिंग प्रकल्पामुळे रेडी गाव भकास झाला आहे. तशी दयनीय स्थिती आजगाव, धाकोरा, भोमवाडी, तिरोडा, शिरोडा, आरवली, आसोली गावांची होणार आहे.

शेती,कोकम, नारळ बागायती तसेच सुरंगीचे उत्पादन दशक्रोशीमध्ये मोठया प्रमाणात घेतले जाते. मायनिंग प्रकल्प लादल्यास ग्रामस्थांच्या पारंपारिक उत्पन्नाचा स्रोत नष्ट होणार आहे. त्यामुळे मायनिंग प्रकल्पाला दशक्रोशीमधून कडाडून विरोध करण्यात आला. माजी आ. वैभव नाईक, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, रुपेश राऊळ, सुदन कवठणकर व कार्यकर्त्यांनी मायनिंग प्रकल्पाला ठामपणे विरोध दर्शवीला. मायनिंग प्रकल्प हद्दपार होऊ दे असे गाऱ्हाणे श्री वेतोबा मंदिरामध्ये घालण्यात आले. ॲड. स्वप्नील आजगावकर यांनी पुढाकार घेऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन शांततेत मिटविण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलनस्थळी मोठा पोलिस फौजफाटा जमा झाला होता.

कंपनीच्या अधिकाऱ्यांना मंदिरात पाचारण

दरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना वेतोबा मंदिरात बोलविण्यात येऊन ड्रोन सर्वेक्षणाबाबत अधिकृत परवानगी आहे का? अशी विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडे शासनाची रीतसर परवानगी आढळून आली नाही. मायनिंग प्रकल्पाला गावांचा विरोध असेल तर तो प्रकल्प रेटण्यात येऊ नयेत असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे हा प्रकल्प करू नका, अशा सक्त सूचना ग्रामस्थांनी अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. हे ड्रोन सर्वेक्षण बंद पाडण्यात आले. घटनास्थळी सावंतवाडी, वेंगुर्ला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. ग्रामस्थांचा उद्रेक पाहून मायनिंग प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यास आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा सर्व्हे आटोपता घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT