माजगाव ग्रामस्थांचे सावंतवाडी तहसीलसमोर उपोषण 
सिंधुदुर्ग

­­Sindhudurg News : माजगाव ग्रामस्थांचे सावंतवाडी तहसीलसमोर उपोषण

गावातील जमिनींचे नकाशे उपलब्ध करण्याची मागणी; तहसीलदार व भूमी अभिलेख अधीक्षकांकडून सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : माजगाव येथील खातेदार शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे उपलब्ध होत नाहीत, याबाबत महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाला वारंवार विनंती अर्ज करूनही यावर काहीच हालचाली होत नसल्याने माजगाव ग्रामस्थांनी गुरुवारी पं. स. माजी सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. या सर्व प्रकाराला संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर तहसीलदार श्रीधर पाटील तसेच भूमी अभिलेखचे उपाध्यक्ष विनायक ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत दोन महिन्यात नव्याने नकाशे देण्याची लेखी ग्वाही दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याने व फाटल्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून ते उपलब्ध करून दिले जात नाहीत, परिणामी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची हद्द निश्चित करता येत नाही. तसेच अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित रहात आहेत. गेली २४ वर्षे माजगाव ग्रामस्थ या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात भूमी अभिलेख कार्यालयाकडे विनंत्या करत आहेत. सन २००२ मध्ये शासनाच्या समाधान योजनेतही हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, परंतु अद्यापपर्यंत यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना उडवाउडवीची आणि खोडसाळ उत्तरे दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

या प्रशासकीय अनास्थेविरोधात छेडण्यात आलेल्या या उपोषणाला राजकीय नेत्यांसह ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला. उपोषणस्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, जि. प. सदस्य विक्रांत सावंत, सुदन कवठणकर,पं. स. सदस्य जितेंद्र गावकर, तसेच माजगाव सरपंच रंजना कानसे,जि. प. माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सरपंच संजय कानसे, दिनेश सावंत, अजय सावंत, आणि चराठा सरपंच प्राची कुबल यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

उपोषण स्थळी तहसीलदार श्रीधर पाटील तसेच भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत जीर्ण झालेले ६० टक्के गावातील नकाशे सुस्थितीत नव्याने होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखवला.​यावर झालेल्या चर्चेत माजगाव येथील एकूण ३२० भूमापन क्रमांकांपैकी ११४ क्रमांकांचे नकाशे सुस्थितीत असून उर्वरित सर्व जीर्ण नकाशे पुनर्गठित करण्यासाठीचा सविस्तर अहवाल १० जुलैपर्यंत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सादर केला जाईल. तेथून हा प्रस्ताव उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवून, मंजुरीनंतर सर्व हितसंबंधितांना नोटीस देऊन ६० दिवसांत मोजणी पूर्ण करुन नवीन अद्ययावत नकाशे जनतेसाठी ग्रामपंचायतीत उपलब्ध केले जातील, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या ठोस लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळी सुरू केलेल्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा मिळाला सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. ​या आंदोलनात अर्जुन सावंत, अमोल वेजरे, पुरुषोत्तम कानसे, तुळशी सावंत, लक्ष्मण सावंत, प्रल्हाद मेस्त्री, जयवंत कानसे, जितेंद्र नाईक, विनोद जाधव, विलास दळवी, अशोक बुरूड, आबा सावंत, श्याम कासार, विशाखा जाधव, सुरेश कासार, विनोद तळेकर, सच्चिदानंद सावंत, गोपाळ तळेकर, चंद्रकांत कुबल यांच्यासह माजगाव ग्रामस्थ व शेतकरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT