कुडाळ: आम्ही रात्रंदिवस रुग्णालयात राबतो, माता-भगिनींची आणि नवजात बालकांची काळजी घेतो. पण आमच्या स्वतःच्या घरात आज चुली पेटवायला पैसे नाहीत. महागाईच्या या काळात चार-चार महिने पगार न मिळाल्यावर आम्ही संसार कसा चालवायचा? रोज कामावर येण्या-जाण्यासाठी खिशात एसटीचे भाडेही उरलेले नाही,अशी गंभीर परिस्थिती कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने राबणाऱ्या ५२ कुशल-अकुशल कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे. प्रशासकीय उदासीनता आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने अखेर हतबल होऊन या कर्मचाऱ्यांनी सोमवार दि.२० जुलै पासून ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे
हक्काच्या पगार नाही, कंत्राटदारांची बेफिकीर!
कुडाळ येथील महिला बालरुग्णालयात सन २०२२ पासून हे सर्व कर्मचारी २४ तास आरोग्य सेवा पुरवत आहेत. ३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कंत्राटाची मुदत संपली. त्यानंतर १ एप्रिलपासून कोणतीही लेखी ऑर्डर नसताना, केवळ रुग्णांची आबाळ होऊ नये या माणुसकीपोटी हे कर्मचारी अविरत काम करत आहेत. मात्र, प्रशासनाने त्यांच्या या प्रामाणिकपणाची किंमत शून्य केली आहे. कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना कंत्राटदारांच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त केला. कंत्राटानुसार ठरलेली रक्कम आणि प्रत्यक्षात आमच्या बँक खात्यात येणारी रक्कम यात मोठी तफावत आहे.
आम्हाला भविष्य निर्वाह निधी किंवा ईएसआयसी यांसारखा कोणताही हक्काचा लाभ दिला जात नाही. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, रुग्णालयात महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या यंत्रणेत काम करणाऱ्या आमच्या महिला कर्मचाऱ्यांना हक्काची 'मातृत्व रजा' आणि त्या काळातील पगार देण्यासही कंत्राटदारांनी नकार दिला आहे,असा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
एजन्सींनी कर्मचाऱ्यांचे फोन केले 'ब्लॉक'
या कर्मचाऱ्यांच्या कष्टावर कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या कंत्राटदारांचा असंवेदनशील चेहरा आता समोर आला आहे. रुग्णालयामध्ये सेवा पुरवणाऱ्या डीएम इंटरप्राईजेस (नवी मुंबई), लक्ष्मीदत्त सोल्युशन्स प्रा. लि. (ठाणे), एस.एस.एस.डब्ल्यू. मॅनेजमेंट प्रा. लि. (नांदेड),राज छाया इनोव्हेटिव्ह सर्विसेस प्रा. लि. (रायगड) या एजन्सीच्या प्रतिनिधींना जेव्हा कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत वेतनासाठी वारंवार फोन केले, तेव्हा या कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्याऐवजी थेट त्यांचे फोन नंबरच 'ब्लॉक' केले आहेत. कंत्राटदारांच्या या क्रूर आणि मुजोर वर्तनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
प्रस्ताव अंतिम टप्प्यात, काम सुरू ठेवा - डॉ.वाळके
या संवेदनशील परिस्थितीवर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय वाळके यांनी प्रशासनाची बाजू मांडली. कर्मचाऱ्यांच्या कंत्राटाची मुदत संपण्यापूर्वीच जानेवारी २०२६ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. कालच झालेल्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत सध्याच्या एजन्सीला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत,असे त्यांनी सांगितले.तसेच, सोमवार सायंकाळपर्यंत पालकमंत्री आणि अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर चर्चा होऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. वाळके यांनी दिले आहे.
..आता २० जुलैकडे लक्ष !
प्रशासनाच्या या लाल फितीत आणि फाईलच्या सुशेगात प्रवासात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मात्र कोंडमारा होत आहे. सोमवार दि. २० जुलैपर्यंत जर लेखी आदेश आणि पगाराची हमी मिळाली नाही, तर हे ५२ कर्मचारी सामूहिक काम बंद करण्याच्या तयारीत आहेत,. जर असे झाले, तर कुडाळ महिला रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत असून, याला सर्वस्वी प्रशासन आणि मुजोर कंत्राटदार जबाबदार असतील, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
एजन्सींच्या त्रासाला कंटाळुन जुन्या कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या!
गेल्या चार वर्षांपासून रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा छळ केवळ थकीत पगारापुरता मर्यादित राहिलेला नाही. कंत्राटदारांच्या मनमानी आणि जाचक कारभाराला कंटाळून रुग्णालयातील काही अनुभवी कर्मचाऱ्यांनी अखेर हतबल होऊन नोकऱ्या सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महागाईच्या काळात सलग ३ ते ४ महिने पगार न मिळणे, कंत्राटदारांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे आणि दाद मागण्याचा प्रयत्न केल्यास थेट फोन ब्लॉक करणे, अशा मानसिक त्रासाला वैतागून अनेकांनी रुग्णालयाला रामराम ठोकला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांवर ही वेळ आल्याने रुग्णालयातील सेवा आता बाह्य एजन्सींच्या भरवशावर किती सुरक्षित आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.