कुडाळ : देशभरात सातत्याने होणारी पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन् दररोज वाढणारी महागाई या विरोधात बुधवारी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने कुडाळात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असल्याचा आरोप करत, शिवसैनिकांनी भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे वैभव नाईक यांनी स्वतः हातात सायकल धरून पायी चालत या मोर्चाचे नेतृत्व केले.
वाढत्या इंधन दरांमुळे सायकल चालवण्याची वेळ आली आहे, हेच त्यांनी सरकारला दाखवून दिले. या आंदोलनात उबाठाचे माजी आ. परशुराम उपरकर, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, अतुल बंगे, कृष्णा धुरी, बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.