कुडाळ : कुडाळ शहरातील १४१ गुंठे खुल्या क्षेत्राच्या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा मनमानी झालेली नसून, उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी आणि विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या अधीन राहूनच सर्व निर्णय घेण्यात आले , अशी माहिती कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ न. प. मधील सत्ताधारी नगरसेविका संध्या तेरसे यांनी न.पं.ची संबंधित १४१ गुंठे जागा नगरपंचायतीच्या ताब्यात न राहण्यास मुख्याधिकारी व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी न.पं.तील आपल्या दालनात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची कालानुक्रमे माहिती दिली.
श्री.औंधकर म्हणाले , मौजे कुडाळ येथील स.नं. ४८, हि. नं. ५ अ,५ब, २१ व स.नं. ४९ हि.नं.१ या जागेमध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी नियोजित रेखांकनास दि. ३ एप्रिल१९९३ रोजी निवासी वापराकरिता मंजुरी देण्यात आलेली होती. महादेव तुकाराम आरेकर तर्फे कुलमुखत्यारी मनीषा महादेव आरेकर, रा. कुडाळ यांनी या कार्यालयाकडे नगरपंचायत हद्दीतील मौजे कुडाळ येथील स.नं. ४८अ१अ/५अ२ या मिळकतीच्या आकारफोड पत्रकातील दुरुस्तीकरीता नाहरकत दाखला मिळणेबाबत अर्ज सादर केला होता. सदर अर्जावर निर्णय घेताना उपलब्ध अभिलेख तसेच विविध न्यायप्राधिकरणांनी दिलेल्या आदेशांचा विचार करण्यात आलेला आहे.
या जागेमध्ये मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी नियोजित रेखांकनास ३ जुलै १९९३ रोजी निवासी वापराकरिता मंजुरी देण्यात आलेली होती. परंतु सदरील रेखांकनामधील खुल्या क्षेत्रापैकी ३७ गुंठे इतक्या जागेवर महादेव तुकाराम आरेकर यांनी २००४ साली अप्पर तहसीलदार कुडाळ यांचेकडे स्वतःला 'कुळ' असल्याचा दावा सादर केला होता. सदर जागेसंदर्भात कुळ वहिवाटीबाबत तहसीलदार- कुडाळ, उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तसेच महाराष्ट्र महसूल प्राधिकरण, मुंबई येथे विविध स्तरांवर प्रकरणे चालविण्यात आली. संबंधित सर्व न्यायप्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत, असे श्री.औंधकर यांनी सांगितले.
सदरील खुले क्षेत्र व अंतर्गर रस्ते हे मूळ मालक बाक्रे यांनी ग्रामपंचायत कुडाळ यांच्याकडे बक्षिसपत्र करून जागा हस्तांतरित केली होती. त्या अनुषंगाने करण्यात आलेली फेरफार नोंद रद्द करण्याबाबत महादेव तुकाराम आरेकर यांनी सरपंच, ग्रामपंचायत कुडाळ यांच्या विरोधात अपिल दाखल केले. सदर अपील प्रकरणात उपविभागीय अधिकारी (महसूल), सावंतवाडी; अप्पर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच अप्पर आयुक्त, कोकण विभाग, मुंबई या तिन्ही प्राधिकरणांनी महादेव तुकाराम आरेकर यांच्या बाजूने आदेश पारित करून फेरफार नोंद क्र. ७७९० रद्द करण्याचे निर्देश दिले.
तसेच सदर क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत मालकीचे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येत असल्याचे समजल्यावर महादेव आरेकर यांनी सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कुडाळ यांचे विरोधात दावा दाखल केला. सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), कुडाळ; जिल्हा न्यायालय, ओरोस यांनी सदर खुल्या क्षेत्रावर महादेव तुकाराम आरेकर यांचा शांततामय ताबा असल्याचे नमूद करून ग्रामपंचायत, कुडाळ यांच्यामार्फत कोणतीही हरकत/अडथळा निर्माण करू नये, असे आदेश दिलेले आहेत. तसेच नगरपंचायतने उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील दाखल केले असता तो अपील फेटाळण्यात आला, असे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे या निर्णयाला अनुसरून या जमिनीबाबत वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाने आपली भुमिका बजावली आहे असे स्पष्टीकरण श्री.औंधकर यांनी दिले.