दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात साकारणार भव्य राष्ट्रीय उद्यान! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Tourism : दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात साकारणार भव्य राष्ट्रीय उद्यान!

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; आ. प्रमोद जठार यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने नटलेल्या तिलारी खोरे परिसरात राज्य शासनाच्या वतीने भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधिमंडळात केली. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी या संदर्भात केलेल्या मागणीला वनमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

विधिमंडळात यासंबंधी मागणी मांडताना आमदार प्रमोद जठार म्हणाले की, तिलारी खोरे परिसर हा ‘सिंधुदुर्गचे ॲमेझॉन’ म्हणून ओळखला जातो. सिंह वगळता जवळपास सर्वच वन्यप्राण्यांचे वास्तव्य या जंगलात आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या या विस्तीर्ण जागेत वन विभागाने राष्ट्रीय उद्यान उभारावे आणि या उद्यानाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे.

हा परिसर ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणूनही ओळखला जातो. गुजरातमध्ये अंबानी यांनी उभारलेल्या ‘वनतारा’ प्रकल्पात बाहेरून हत्ती आणून त्यांचे संवर्धन केले जाते; मात्र तिलारी खोऱ्यात नैसर्गिकरीत्याच जंगली हत्ती वास्तव्यास आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. दोडामार्गपासून अगदी जवळच मोपा विमानतळ असल्याने या राष्ट्रीय उद्यानाचा फायदा देशी-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे या उद्यानाचा अर्धा भाग प्राण्यांच्या संवर्धनासाठी राखीव ठेवून उर्वरित अर्ध्या भागात ‘जंगल सफारी’ सुरू करावी, अशी मागणी आ. जठार यांनी केली.

वनमंत्री गणेश नाईक यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून तिलारी परिसरात राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणपूरक पर्यटनाला आणि वन्यजीव संवर्धनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT