होडावडा शाळा भरली पंचायत समिती कार्यालयात 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : होडावडा शाळा भरली पंचायत समिती कार्यालयात

शिक्षक नसल्याने पालकांचा निर्णय; अतिरिक्त शिक्षक देण्याचे सभापतींचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : तालुक्यातील होडावडा नं. १ शाळेत ६० पटसंख्या असताना गेले वर्षभर केवळ २ शिक्षक असल्याने याचा विद्यार्थ्यांवर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचा आरोप करत व वारंवार पाठपुरावा करून अतिरिक्त शिक्षक मिळत नसल्याने अखेर संतप्त पालकांनी सोमवारी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क वेंगुर्ले पं. स. इमारतीत शाळा भरवली. सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी यशस्वी तोडगा काढल्यानंतर मुलांना होडावडा नं. १ येथे पुन्हा पाठवण्यात आले.

उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या. मात्र, होडावडा नं. १ च्या विद्यार्थ्यांना पालकांनी चक्क पहिल्या दिवशी वेंगुर्ला पं. स. इमारतीत सर्व विद्यार्थ्यांना आणत याच ठिकाणी शाळा भरवली. गेली ४ वर्षे या शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. शाळेचे २ शिक्षक व इतर कामगिरी शिक्षक देऊन हा गाडा चालवला जात आहे. वारंवार कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. शाळेची पटसंख्या ६० असताना केवळ २ शिक्षक शाळेत आहे. जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक शाळेला मिळत नाही तोपर्यंत मुलांची शाळा रोज पंचायत समितीत भरवण्याचा पवित्रा ग्रामस्थ व पालकांनी घेतला.

दोन दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन

सभापती शंकर घारे, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, प्रभारी गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांनी एकत्रित यावर चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. यानंतर गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी होडावडा नं. १ शाळेला पुढील २ दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात व शैक्षणिक वर्षात १ शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT