कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर पावशी श्री मार्कंडेय मंदिर समोर गोवा ते रत्नागिरी अशी मासे वाहतूक करणाऱ्या टेम्पोला रविवारी पहाटे ४.१५ वा.च्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने रिफ्लेक्टर्स नसलेल्या महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेत नव्यानेच बसविण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली.
कुडाळ शहरापासून जवळच असलेल्या पावशी येथील श्री मार्कंडेय मंदिरासमोर महामार्गालगत सर्व्हिस रस्ता बांधण्यात आला आहे. महामार्ग व सर्व्हिस रस्ता यांच्या मधोमध सुरक्षेच्या दृष्टीने अलिकडेच संरक्षक लोखंडी रेलिंग उभारण्यात आले आहे. संपूर्ण सर्व्हिस रस्त्यालगत हे रेलिंग न उभारता मध्ये मध्ये रेलिंग उभारण्यात आले आहे. दरम्यान गोवा येथून रत्नागिरीला मासे वाहतूक करणारा टेम्पो तेथे आला. चालकाने मागाहून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याचा प्रयत्न केला असता चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटले व टेम्पो लोखंडी रेलिंगला धडकला. टेम्पो तसाच काही अंतर पुढे जाऊन रेलिंगवर उभा राहिला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र टेम्पो व माश्यांचे तसेच महामार्गाच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले आहे.