दोडामार्ग बस स्टँड समोरील चिरे बंदी तट कोसळला दिसत आहे. (छाया : रत्नदीप गवस) 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | दोडामार्ग बस स्थानकातील एसटी बस रात्रीच्या वेळी परस्पर फिरवून आणली; कठड्याला धडकून थेट महामार्गावर उभी केली!

बसमधील ४५ डिझेलही चोरले : अर्धी बस महामार्गावर अर्धी बसस्थानकात उभी पाहून सारेच चक्रावले

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग बसस्थानकाच्या आवारात उभी केलेली कोल्हापूर–दोडामार्ग एसटी बस रात्रीच्या वेळी कोणीतरी घेऊन गेला. बस चिरेबंदी कुंपण तोडून थेट महामार्गावर पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला होता. बस केवळ सरकली नसून कोणीतरी ती चालवून बसस्थानकाबाहेर नेली, बसस्थानकावरील सुरक्षा कठड्याला नंतर धडक देत बस फिरवून पुन्हा बसस्थानकाच्या आवारात आणून उभी केली असावी, असा अंदाज चालक व वाहकांनी व्यक्त केला होता.

या प्रकारात बसचे नुकसान झाले असून बसमधील तब्बल ४५ लिटर डिझेलही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. बसस्थानकातील एसटी रात्रीच्या वेळी कुणी नेली, ती नेमकी कुठपर्यंत फिरवण्यात आली आणि डिझेल चोरीचा प्रकार कोणी केला, याबाबत दोडामार्ग तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर–दोडामार्ग वस्तीची एसटी बस नेहमीप्रमाणे दोडामार्ग बसस्थानकाच्या आतील आवारात उभी करण्यात आली होती. बसचे चालक श्रीकांत मारुती पाटील व वाहक सागर अरुण मुदगी यांनी बस नियोजित जागी पार्क केली होती. दिवसभराची सेवा संपल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून दोघेही बसस्थानकाच्या आवारात झोपण्यासाठी गेले. रात्रीच्या वेळी बस सुरक्षितपणे उभी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडेल, याची कल्पना त्यांना नव्हती.

मात्र, शनिवारी सकाळी उठल्यानंतर चालक व वाहकांना बस उभी केलेल्या मूळ जागेवर दिसून आली नाही. बस दुसऱ्या ठिकाणी विचित्र अवस्थेत उभी असल्याचे पाहून त्यांनी पाहणी केली. त्यावेळी बसस्थानकाच्या चिरेबंदी कुंपणाचा काही भाग कोसळलेला दिसून आला. बसचा काही भाग बसस्थानकाच्या आवारात, तर उर्वरित भाग मुख्य महामार्गावर असल्याने चालक व वाहकांना आश्चर्याचा धक्का बसला.

​बस कुणीतरी चालवून नेल्याचा चालक–वाहकांचा संशय

​बसची अवस्था पाहता, रात्रीच्या वेळी बस केवळ उतारामुळे सरकली नसून कोणीतरी बस घेऊन बाहेर गेल्याचा संशय चालक व वाहकांनी व्यक्त केला. त्यांच्या अंदाजानुसार, बसस्थानकातून बस बाहेर नेण्याच्या प्रयत्नात किंवा बस चालवताना नाल्याजवळील सुरक्षा कठड्याला बसने जोरदार धडक दिली असावी. त्यानंतर बस फिरवून पुन्हा बसस्थानकाच्या आवारात आणून उभी करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. बसची स्थिती, कुंपणाचे झालेले नुकसान आणि सुरक्षा कठड्याला धडक दिल्याचा प्रकार पाहता, रात्रीच्या वेळी बस कोणीतरी चालवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मात्र, नेमका घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही.

​बसची पाहणी करताना सुमारे ४५ लिटर डिझेल चोरीला गेल्याचे चालक व वाहकांच्या लक्षात आले. बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या एसटीमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल गायब होणे तसेच बसच्या हालचालीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रकार यामुळे या घटनेचे गूढ आणखी वाढले आहे.

​बसस्थानकातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

​या घटनेमुळे बसस्थानकातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात वाहनांची देखरेख कशी केली जाते, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात डिझेल चोरीस गेल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

दोडामार्ग बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर येत आहे. ​ सकाळी बसचा काही भाग बसस्थानकाच्या आवारात, तर उर्वरित भाग महामार्गावर आढळल्याने सकाळी या प्रकाराची चर्चा सुरू झाली. बसस्थानकाच्या चिरेबंदी कुंपणाचा भाग तुटलेला, सुरक्षा कठड्याला धडक दिल्याचा संशय आणि बसचे नुकसान अशा अनेक बाबी एकाच घटनेत समोर आल्याने हा प्रकार सामान्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

​सकाळी ६.३० ची कोल्हापूर फेरीही राहिली बंद

​ही बस दररोज सकाळी ६.३० वाजता दोडामार्ग बसस्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने रवाना होते. मात्र, शनिवारी सकाळी बसची झालेली विचित्र अवस्था, कुंपणाचे नुकसान आणि डिझेल चोरीचा प्रकार समोर आल्याने नियोजित फेरी रवाना होऊ शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT