Congress Protest 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : इंधन दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

दरवाढ कमी न केल्यास तीव्र लढा उभारू : अरविंद मोंडकर

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : राज्यात आणि देशात वाढत्या पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले असून, या दरवाढीबरोबर महागाई वाढली आहे. मोदी सरकारच्या या दरवाढीच्या भूमिकेविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडत जिल्हाधिकऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, शासनाने पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढ कमी न केल्यास काँग्रेस हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्‍याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सिंधुदुर्ग नगरी येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेल दरवाढीचा करायचं काय’, अशा विविध घोषणा यादरम्यान देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अरविद मोंडकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे, प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण ,ईशाद शेख, अरुण टेंकलकर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना निवेदन सादर केले, त्यांनी सदरचे निवेदन शासनाला सादर करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलेे आहे, मागील ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत, ही दरवाड आधीच महागाईने त्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किंमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मागील काही वर्षात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांच्या आसपास होते.

पेट्रोल, डिझेल व गैस सिलिंडरच्‍या किमती वाढल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो. फक्त इंधनच महाग होत नाही तर जीवनावश्यक वस्तूसह सर्व प्रकारची महागाई होते. उत्पन्‍न वाढत नाही, पण महागाई मात्र वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.

सरकारने जनतेला दिलासा देणे गरजचे आहे, त्यामुळे संकटात असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत होईल यासाठी व्यवस्था करावी. शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो, त्यासाठी डिझेलची आवश्यकता आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने डिझेलअभावी शेतीची कामे खोळंबलेली आहेत. शेतीची कामे वेळेत झाली नाहीत तर अन्‍नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होईल व पुन्हा महागाई वाढेल, हे दुष्टचक्र थांबवले पाहिजे.

सर्व मुद्यांचा संवेदनशिलतेने विचार करून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी व पेट्रोल डिझेलचा पुरवठा कसलीही बाधा न येता सुरळीत करावा याची दखल न घेतल्यास आम्हाला पुन्हा महागाई आणि पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल तीव्र आंदोलन छेडावे लागतील, असा इशाराच देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT