देवगड : आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांचा न्याय्य मागण्यांसाठी गेली पाच-सहा महिने आंदोलने करूनही सरकारचे डोळे उघडले नाही व सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही यामुळे बागायतदार शेतकरी यांच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जुलै रोजी आंबा बागायतदार शेतकरी यांचा भव्य मेळावा घेवून जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचबरोबर देवगड येथे होऊ घातलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पालाही आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून देवगड तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा प्रकल्प कुठेही होवू देणार नाही, असा इशारा आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिला.
जामसंडे येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ढोके यांनी आंबा बागायतदार व शेतकरी संघटनेच्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. गणेश गावकर, प्रशांत शिंदे, किरण टेंबुलकर, अजय नाणेरकर, राजीव वाळके, दिनेश धुवाळी, शरद वाळके, गणेश वाळके, नीलेेश पेडणेकर आदी उपस्थित होते.
काका ढोके म्हणाले, संघटनेच्या वतीने आंबा बागायतदार शेतकऱ्यांचा न्याय मागण्यांसाठी विविध आंदोलने छेडण्यात आली. मात्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचा बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली असून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ३ जुलै रोजी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे बळी गेल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही.पावसाळी अधिवेशन सुरू असून जलसमाधी आंदोलनातून एखाद्या बागायतदाराचे बलिदान गेले तर त्याचा बलिदानातून इतर बागायतदारांना तरी पावसाळी अधिवेशनातून शासन न्याय देईल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावाला. एकीकडे आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात असताना शासनाने तुटपुंजी मदत देऊन त्याची थट्टा केली आहे. दुसरीकडे अणु ऊर्जासारखे विनाशकारी प्रकल्प देवगडमध्ये आणून आंबा बागायतदारांच्या बागा उद्ध्वस्त करू पाहत आहे. या प्रकल्पाला संघटनेचा तीव्र विरोध असून यासाठी आंबा बागायतदार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा काका ढोके यांनी दिला. त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मुणगे व हदळे पंचक्रोशीतील नागरिकांचेही कौतूक करून त्यांचा पाठीशीही संघटना ठामपणे उभी राहील, असे सांगितले.
गणेश गावकर म्हणाले, बागायतदार उद्ध्वस्त झाला असताना तो रस्त्यावर उतरूनही शासनाला जाग आली नाही. २२० रुपये तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांना खिजविण्याचे काम केले आहे. ही मदत शासनाने स्वत:चा फंडपेटीत जमा करून घ्यावी. बागायतदार संघटना आपल्या मागणीवर ठाम असून आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये मदत द्यावी, हीच ठाम मागणी असल्याचे श्री. गावकर यांनी सांगीतले.
शासनाला अणुऊर्जासारखा घातक प्रकल्प आणून आंबा व काजू बागायतदार यांना बेघर करायचे आहे. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मुणगे ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनाला आमच्या संघटनेचाही पाठींबा असून हा विनाशकारी प्रकल्प देवगडमध्ये नव्हे तर जिल्ह्यात होऊ देणार नाही, असा इशारा गावकर यांनी दिला. विनाशकारी प्रकल्प आणण्यापेक्षा पर्यटनात्मक प्रकल्प आणा.
आम्ही तुमच्या पाठीशी राहू. अणुउर्जा प्रकल्पाचा माध्यमातून नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत आहेत, मात्र या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन गावकर यांनी केले. या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असून प्रकल्प विरोधासाठी देवगड तालुका अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.