Devgad Jamsande Water Supply Issue
देवगड: देवगड– जामसंडे शहरातील पाणीप्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नळयोजना दुरुस्ती व सुधारणा काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट सवाल दिनेश पारकर, अण्णा खवळे व योगेश गोळम यांनी उपस्थित केला. यावेळी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी काम पूर्ण झाल्यानंतर फक्त दोन वर्षेच देखभाल (मेंटेनन्स) जबाबदारी कंपनीची राहील, असे स्पष्ट केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले.
पाईपलाईन वारंवार फुटणे, दुरुस्तीची कामे रखडणे आणि त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होणे, या समस्यांवर नगरपंचायतीनेच ठोस तोडगा काढावा व जबाबदारी स्वीकारावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली. गेली दहा वर्षे पाणीप्रश्नामुळे आम्ही त्रस्त असून वारंवार विकत पाणी घ्यावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
गणेश सागवेकर व राजु मेस्त्री यांनी पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घेत मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधीला जाब विचारला. ग्रामस्थांच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विलास रूमडे, बाळा लळीत, आप्पा मांजरेकर, अनिल खडपकर व उल्हास मणचेकर यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले.
पाणी ही अत्यंत गंभीर समस्या बनली असून ग्रामस्थांचा उद्रेक साहजिक आहे. या प्रश्नामुळे निर्माण झालेली अस्वस्थता व वेदना ते व्यक्त करत आहेत. हा उद्रेक भविष्यात अधिक तीव्र होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासनाने जबाबदारीने पावले उचलावीत, असे मत अण्णा खवळे यांनी व्यक्त केले. हा प्रश्न समन्व समितीच्या माध्यमातून सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांनी शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. देवगड व जामसंडे या दोन्ही शहरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोर्ले-सातंडी धरणावरून प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समन्व समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
समन्वय समितीचे कामकाज कसे असेल, याची सविस्तर माहिती चारूदत्त सोमण यांनी यावेळी दिली. बैठकीस उद्योगपती नंदकुमार घाटे, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, निशिकांत साटम, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, नगरसेवक शरद ठुकरूल, प्रणाली माने, रूचाली पाटकर, आद्या गुमास्ते, तन्वी चांदोस्कर, चंद्रकांत कावले आदी उपस्थित होते.