School News File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सिंधुदुर्गातील शाळा सकाळच्‍या सत्रात भरविण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जि. प. सीईओंना लेखी निवेदन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या उन्हाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून, जून महिन्याच्या मध्यापर्यंतही उष्णतेची तीव्रता कायम आहे. पावसाचे आगमन विलंबाने होत असल्याने उष्णतेचा कालावधी अधिक लांबला आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांमध्ये उष्माघात, निर्जलीकरण, डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा यांसारख्या उष्णताजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

अनेक शाळांमध्ये थंड पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्णतेपासून संरक्षणाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून शाळा सकाळ सत्रात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गने सर्व माध्यमिक शाळांचे वेळापत्रक स. ७.३० ते ११.३० असे करण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच शाळा नियोजित वेळेत सुरू करावयाच्या असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याबाबत निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. कडक उन्हामुळे विदर्भातील शाळा २९ जून पासून सुरू होत आहेत. तर सिंधुदुर्गातील शाळा १५ जून पासून सुरू झाल्या आहेत.यात अशा वेळी मान्सून लांबल्यान जिल्ह्यात सुद्धा प्रचंड उष्णता आहे. पाऊसच नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा पण सामना करावा लागत आहे. या कडक उन्हात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये अशी शिक्षक परिषदेचे भूमिका आहे.आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रवींद्र खेबुडकर काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT