खोल समुद्रातील मच्छिमारी बंद, नौका किनाऱ्यावर 
सिंधुदुर्ग

Fishing Ban : खोल समुद्रातील मच्छिमारी बंद, नौका किनाऱ्यावर

खाडीतील पारंपरिक मच्छिमारीला होणार सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

देवगड : मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्याने समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद झाली असून किनाऱ्यावर घेतलेल्या नौकांच्या शाकारणीला वेग आला आहे. खाडीतील पारंपरिक मच्छिमारीला सुरुवात होणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने मासळीची टंचाई जाणवत आहे.

शासनाने खोल समुद्रातील मासेमारीच्या बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा केला आहे. त्यामुळे आता समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. देवगड बंदरातील बहुतांशी नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत. तर काही नौकांच्या शाकारणीचे काम वेगाने सुरू आहे. नौकांची शाकारणी, जाळे धुणे, सुकविणे ही सर्व कामे आटोपल्यानंतर नौकांवर काम करणारे परप्रांतीय व स्थानिक कामगारही आपल्या गावी जाणार आहेत. यामधील काही नौकांची किनाऱ्यावर घेतल्यानंतरची सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे त्या नौकांवरील खलाशी आपल्या गावी रवाना झाले आहेत. मासेमारी बंद झाल्यामुळे बंदरावरील वर्दळही खूप कमी झाली आहे. बहुतांशी नौका किनाऱ्यावर आल्या असून काही नौकांची शाकारणी झाली आहे तर काही नौकांची शाकारणी सुरू आहे.

समुद्रातील मच्छिमारी बंदी कालावधीत खाडीतील मासेमारी करण्यात मच्छिमार गुंतले आहेत. छोट्या होड्यांच्या साहाय्याने खाडीपात्रात ही मच्छिमारी केली जाते. तालुक्यातील वाडातर, तारामुंबरी, मोंड, तांबळडेग,कट्टा, मळई या खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर छोट्या होडीच्या साहाय्याने खाडीत जाळी टाकून ही मच्छिमारी केली जाते. मात्र पावसाला नुकतीच सुरुवात झाली असल्याने खाडीतील पारंपरिक मासेमारीलाही अजून सुरुवात झालेली नाही.

समुद्रातील मच्छिमारी बंद झाल्यानंतर सुरमई,पापलेट,सरंगा हे चांगल्या दर्जाचे मासे मिळणे बंद झाल्यामुळे खाडीतील सुळा, गुंजली, तांबोसे या माशांना पावसाळ्यात हॉटेल व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते. देवगडमधील स्थानिक हॉटेलच्या मेनू बोर्डवर देखील सुरमई, पापलेट, सरंगा या माशांची जागा खाडीच्या सुळा, तांबोसा हे मासे घेतात. मात्र या मच्छिमारीला अद्याप सुरुवात झालेली नाही. यामुळे सद्यस्थितीत हे मासे उपलब्ध नाहीत. परिणामत: एकीकडे खोल समुद्रातील मच्छिमारी सुरू असताना सरंगा, पापलेट, सुरमई असे चविष्ट मिळणारे मासे आता बंद झालेले असतानाच खाडीतील पारंपरिक मच्छिमारीला अद्याप सुरुवात न झाल्याने खवय्यांना मासळी मिळणे कठीण झाले आहे.

खोल समुद्रातील मच्छिमारी बंद झाल्याने ऑक्टोबरपासून गजबजलेले लिलाव सेंटरही आता सुन्ने सुन्ने आहे.बाहेरून येणारा व्यापारीवर्गही आता बंद झाला आहे. तसेच बाहेरून मासळी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला व्यावसायिकही येणे बंद झाले आहे.

जिल्ह्यात देवगड तालुक्यात मळई, मोंड, तारामुंबरी, तांबळडेग मोर्वे, विजयदुर्ग, मणचे, मालवण तालुक्यात आचरा, कालावल, कोळंब, तारकर्ली देवबाग, तळाशील रेवंडी, वेंगुर्ला तालुक्यात मोचेमाड, निवती, केळूस तसेच आरोंदा आदी खाड्यांमध्ये पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय चालतो.या खाड्यांमध्ये कांडाळी, पागाद्वारे मच्छिमारी केली जाते.प्रामुख्याने सुळा, शेतूक, गुंजली, लेप, शेंगटी, कापटे, डायन, तांबवसे, बानवशी, पालू, केोकरी अशाप्रकारचे मासे मिळतात.मात्र अद्याप पावसालाही चांगली सुरुवात झाली नसल्याने खाडीतील पारंपरिक व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या खाडीमध्ये चांगल्या दर्जाची मासळी मिळत नसल्याने पारंपरिक मच्छिमारी व्यवसायालाही अजुन गती आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT