सिंधुदुर्ग

Sindhudurg news | क्रशर व्यावसायिकांकडून तहसीलदारांचे आदेश धाब्यावर

विलवडे, वाफोली परिसरातील खाणींमधून पुन्हा सुरुंग स्फोट | ग्रामस्थांमधून तीव्र संताप

पुढारी वृत्तसेवा

बांदा : विलवडे, वाफोली व परिसरातील दगड खाणींवर कारवाई करत त्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचे तहसीलदारांनी दिलेले स्पष्ट आदेश अवघ्या काही तासांतच धुळीस मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी दिलेल्या स्थगितीच्या निर्देशानंतरही बुधवारी दिवसभरात तब्बल ११ सुरुंग स्फोट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खाणींमुळे होणारा त्रास, घरांच्या भिंतींना पडणारे तडे आणि आरोग्याच्या समस्या यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत अंतिम अहवाल येईपर्यंत सर्व खाणी बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.

मात्र, या आदेशाचे पालन न होता दुसऱ्याच दिवशी पुन्हा स्फोटांची मालिका सुरू झाल्याने प्रशासनाच्या आदेशालाच उघड आव्हान दिल्याचे चित्र आहे. सकाळच्या सुमारास काही स्फोट झाल्यानंतर दुपारच्या वेळेत अल्पावधीत सलग स्फोट घडवून आणण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ही बाब समजताच विलवडे व आजूबाजूच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी तलाठी यांना तातडीने बोलावून घेतले आणि प्रत्यक्ष खाणीपर्यंत नेऊन सुरू असलेले काम दाखवले. आदेश असूनही काम सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तीव्र आंदोलनाचा इशारा

"यापुढे कोणतेही निवेदन देणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांचे हाल पाहू नका," असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आदेशाला किंमतच उरली नाही?

तहसीलदारांनी लेखी आदेश दिल्यानंतरही खाणी सुरू राहणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. 'अशा प्रकारे आदेश धाब्यावर बसवले जात असतील, तर प्रशासनाचा धाक उरला आहे का?' असा सवाल उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या भूमिकेबाबत संशयाचे अधिक गडद होत असून 'सगळं काही गोलमाल आहे' अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. काही स्तरांवर संगनमत असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलीस ठाण्यात धाव; निवेदन सादर

या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी बांदा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित खाण चालकांसह जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत निवेदन सादर केले. आदेशाचे उल्लंघन करून सुरुंग स्फोट केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अपेक्षा

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे लागले आहे. संबंधित खाणी तातडीने बंद करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रशासनाच्या विश्वासार्हतेची परीक्षा

विलवडे परिसरातील ही घटना केवळ स्थानिक समस्या न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेची परीक्षा ठरत आहे. आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT