सिंधुदुर्गनगरी : आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणूक यांसारख्या अतिसंवेदनशील कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत, दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत आणि मालवणचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय माने यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवला आहे. सावंत यांच्या निलंबनाची शिफारस ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे, तर माने यांच्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ६ जुलै रोजी दोडामार्ग तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. वझरे गावात झाडे पडून सुमारे ३० घरांचे नुकसान झाले होते. या पाहणी दौऱ्यात गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत अनुपस्थित असल्याचे समोर आले. तसेच, २० एप्रिल रोजी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत धोकादायक झाडे तोडण्याबाबत ग्रामपंचायतींना दिलेल्या सूचनांचा पाठपुरावा करण्यातही त्यांनी कसूर केली. याशिवाय, दोडामार्ग तालुक्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (निवडणूक) कार्यक्रमाच्या आढावा बैठकीलाही ते विनापरवानगी गैरहजर राहिले.
दुसरीकडे, मालवण येथेही निवडणूक कामकाजाच्या आढावा बैठकीत असाच प्रकार निदर्शनास आला. मालवणचे विस्तार अधिकारी संजय माने यांची सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आगाऊ सूचना देऊनही माने विनापरवानगी अनुपस्थित राहिले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी शासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहणे आणि महत्त्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे या अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून, आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.