सिंधुदुर्ग : अखेर जि.प.तील बांधकाम विभागामध्ये असलेल्या कामांच्या व अनामत रकमेच्या बिलांवर बनावट सह्या करून रकमा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे हे या गुन्ह्याचा तपास करत असून, आणखीही अनेकजण पोलिसांच्या चौकशीच्या रडारवर आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर जि.प.मध्ये जोरदार घडामोडी घडल्या आणि मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
१३ सप्टेंबर २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या काळात हा गुन्हा घडला आहे. जि.प.कार्यालयाच्या ठिकाणी हा गुन्हा घडला असून, मंगळवारी रात्री उशिरा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली. यानुसार मोहन विद्याधर केळुसकर (रा. कणकवली), ओमकार तुळशीराम पाताडे (रा. सुकळवाड, ता. मालवण), ओमकार नंदकुमार पडते (रा. कुडाळ पडतेवाडी), मंदार आनंद दामोदर (रा. पडवे, ता. कुडाळ), लक्ष्मण शिवराम राऊळ (रा. कारिवडे, ता. सावंतवाडी) या पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या पाच ठेकेदारांकरवी एकूण १३ बिलांवर कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ बिले ही कामांची असून १० बिले कामांच्या अनामत रकमेची आहेत. यातील एका बिलाचे ८ लाख १६ हजार ४३६ रु. रकमेचे बिल संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे.
१६ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पाच ठेकेदारांनी एकूण १३ बिलांवर कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट सह्या करून घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मुभा कार्यकारी अभियंत्यांना दिली होती. तत्पूर्वी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.
हा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांकडून तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात खूप उशीर झाला. त्यात पुन्हा कार्यकारी अभियंता सावंत हे २९ जूनपर्यंतच्या दीर्घ रजेवर गेले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये ते प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. महाविकास आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला. त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला.
पोलिसांकडून आता कागदपत्रांची पडताळणी
गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. यामध्ये ठेकेदारांकडे बांधकाम विभागातील कोणाच्या हस्तक्षेपातून बिले देण्यात दिली, ठेकेदारांना बिलांवर बोगस सह्या करण्याची संधी कुणामुळे मिळाली, बोगस सह्यांच्या खाली जे शिक्के मारण्यात आले आहेत ते कोणी मारले किंवा ठेकेदारांना शिक्के कोणी दिले, या अनुषंगाने प्रकरणांची चौकशी होणार आहे. सध्यातरी पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आणखीही काहींविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.