सावंतवाडी : पहिल्याच पावसात सावंतवाडी शहरातील वन विभाग कायार्लयासमोर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने रस्ता पाण्याखाली गेला. तर गटाराचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी फसली. अखेर टोईंग व्हॅनच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली.
वन विभाग कार्यालयासमोरील मोरीचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले. आहे. मात्र अधिकारी, ठेकेदाराकडून आवश्यक दक्षता न घेतल्याने मंगळवारी झालेल्या पावसात पाणी रस्त्यावर तुंबले. यात कारचे चाक गटरात अडकून बसल्याने ती बाहेर काढण्यासाठी टोईंग व्हॅनची मदत घ्यावी लागली. यात सुमारे एक तास रस्ता बंद राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक एसटी बस अडकून पडल्याने नागरिकांसह प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी पुढाकर घेत मदतकार्य राबविले.
याबाबत न.प. बांधकाम अभियंत्यांना विचारले असता, आचारसंहिता लागल्याने वर्क ऑर्डर मिळायला उशीर झाला. त्यामुळे काम सुरू होण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. मोरीच काम पावसाळ्यापूर्वी होण अपेक्षित होत. मात्र, आचारसंहितेच कारण देत भर पावसात नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात काम केली जात आहेत. याचा नाहक मनस्ताप शहरवासीयांना सहन करावा लागत असून प्रशासकीय राजवट बरी होती, अशा भावना नागरीक बोलून दाखवत आहेत.
मोरीच काम करताना शेजारील गटाराचे पाणी जाणार कुठे? याची दक्षता संबंधित विभागाने घेणं आवश्यक होतं. मात्र, उघड्या गटारा शेजारी बॅरीकेट लावण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली, तर भर पावसात अशी कामे कशासाठी? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.