साळशीत ‘भल्ली भल्ली भावय’चा गजर 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : साळशीत ‘भल्ली भल्ली भावय’चा गजर

पावसाअभावी विहिरीच्या पाण्याने खेळला चिखल

पुढारी वृत्तसेवा

संतोष साळसकर

शिरगाव : ‘भल्ली भल्ली भावय... साळशीच्या संता’च्या जयघोषात देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथील ८४ खेड्यांची अधीपती आणि श्री संत सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील पटांगणात ‘भावई’ हा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पार पडला. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने यावेळी मंदिराच्या विहिरीतील पाणी मोटर पंपाद्वारे उपसा करून सर्वत्र चिखल करून त्याचा आनंद सर्वांनी लुटला.

आषाढ महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी ‘भावई’ या उत्सवाने या देवीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. या उत्सवाच्या आदल्या दिवशी सायंकाळी ‘देसरूढ’ पिटाळले जाते. गावातील रोगराई, भुतावळ गावच्या चतुरसीमेवर पिटाळली जाते, जेणेकरून गावातील लोकांचे रक्षण व्हावे ही त्यामागील भावना असते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कर्क संक्रातीला दुपारी ‘भावई’ या उत्सवाला सुरुवात होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या उत्सवाला खरी रंगत येते. भात शेतीच्या कामातून वेळ काढत गावकरी मंडळी अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात या उत्सवात सामील होतात. या दिवशी सकाळी श्री देव गांगो, श्री देव वशिक तळखंबा व श्री देवी पावणाई या स्थळांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर दुपारी गावातील सर्व बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ, भाविक याठिकाणी जमा होतात.

यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, एकमेकांवर चिखलफेक आणि पाण्याचा मारा करीत असताना कुणीही कुणावर रागावत नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण वागतात. यावेळी देवीच्या समोरील पटांगणात चिखलात खोलवर गाडलेले श्रीफळ प्रत्येकजण गोल रिंगण करून हस्तकौशल्याने काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात. यावेळी प्रत्येकाच्या अंगावर चिखल आणि पाण्याचा मारा केला जातो. यावेळी होळदेवकडील सुमारे १०० किलो वजनाचा गोल दगड प्रत्येकजण आपल्या हस्तकौशल्याने उचलून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT