नरडवे प्रकल्पासाठी याच नदीवर घळभरणी होणार आहे. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| नरडवे प्रकल्‍प : २ हजार कोटींचा सु. प्र. मा. प्रस्‍ताव शासनाकडे सादर

आतापर्यंत सुमारे ११०० कोटी खर्च : दुष्‍काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा तरी घळभरणी होणार का?

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : १९९९ - २००० पासून प्रत्‍यक्ष कामास सुरूवात झालेला कणकवली तालुक्‍यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्‍प पूर्णत्‍वास कधी जाणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. १७९० मीटर लांबी असलेल्‍या धरण प्रकल्‍पाचे बहुतांशी माती भराव काम पूर्णत्‍वास गेले असून २५ लाख क्‍यूबीक मीटरचे घळभरणीसाठी माती काम शिल्‍लक आहे. यंदा जिल्‍ह्यातील दुष्‍काळ सदृश्य परिस्‍थिती पाहता या प्रकल्‍पात २०२७ च्या पावसाळ्या पूर्वी तरी घळभरणी होवून पाणीसाठा होणार का? हा खरा प्रश्न आहे. आतापर्यंत या प्रकल्‍पावर सुमारे ११०० कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे २ हजार कोटीचा पाचवा सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्‍ताव पाटबंधारे विभागाने राज्‍य शासनाकडे पाठवला आहे. विशेष म्‍हणजे घळभरणीच्या कामासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

१९८६-८७ मध्ये पहिली प्रशासकीय मंजूरी मिळालेल्‍या या प्रकल्‍पाच्या कामाला १९९९ -२००० पासून सुरूवात करण्यात आली. मात्र कधी अपुरा निधी तर कधी प्रकल्‍पग्रस्‍तांचे प्रलंबित प्रश्न या कारणांमुळे हा प्रकल्‍प जवळपास २० वर्षे रखडला होता. मधल्‍या काळात या प्रकल्‍पाला केंद्र शासनाने भरीव निधी दिला. त्‍यानंतर या प्रकल्‍पाच्या कामाला गती मिळाली. मात्र नंतर प्रलंबित प्रश्नांमुळे धरणग्रस्‍तांनी हे काम बंद पाडले होते. त्‍यानंतर पुन्हा या कामाला सुरूवात करण्यात आली. गेली २ वर्षे या धरणाचे काम गतीने करण्यात आले. जवळपास बहुतांशी माती भराव काम पूर्ण झाले असून आता घळभरणीचे काम शिल्‍लक आहे. गतवर्षीपासून पाटबंधारे विभागाने घळभरणीबाबत हालचाली सुरू केल्‍या होत्‍या. त्‍यासाठी पुनर्वसन गावठणांमध्ये नागरी सुविधांची कामे करण्यात आली. मात्र गावठणांमध्ये पुनर्वसन करणाऱ्या प्रकल्‍पग्रस्‍तांची घरांची कामे झाली नसल्‍याने घळभरणीच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली. सध्या दिगवळे आणि संभाजीनगर या पुनर्वसन गावठणांमध्ये घरांची कामे सुरु करण्यात आली आहेत. घळभरणीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्‍थितीत बैठक होवून त्‍यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्‍याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र जर पावसाळ्या अगोदर घळभरणी करून पाणी साठवायचे असल्‍यास या कामाला लवकरच सुरूवात करावी लागणार आहे. घळभरणीसाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यंदाची राज्‍यासह जिल्‍हयातील दुष्‍काळी परिस्‍थिती पाहता नरडवे धरणामध्ये घळभरणी होवून लवकरात लवकर पाणीसाठा होणे आवश्यक आहे. त्‍याबाबत काय निर्णय होतो हे पुढील काळात स्‍पष्‍ट होणार आहे.

वर्षानुवर्षे हा प्रकल्‍प रखडल्‍याने या प्रकल्‍पाच्या किंमतीत मोठी वाढ होत गेली. या प्रकल्‍पाची मुळ नियोजित किंमत ३२.४४ कोटी होती. ३१ मार्च २०१० अखेरपर्यंत या प्रकल्‍पावर २१६ कोटी रुपये खर्च झाले. त्‍यानंतर या प्रकल्‍पाला वेळोवेळी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आल्‍या. सुमारे १०७४ कोटीची चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती. तर आता २ हजार कोटीच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्‍ताव पाटबंधारे विभागाने शासनाकडे पाठवला आहे. आतापर्यंत या प्रकल्‍पावर सुमारे ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. घळभरणी व इतर अनुषंगिक कामे, प्रलंबित मोबदला यासाठी आणखी ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नरडवे पाटबंधारे प्रकल्‍पांतर्गत गडनदीवर चौदा के.टी. बंधारे मंजूर करण्यात आले होते. त्‍यातील अकरा बंधारे बांधून पूर्णत्‍वास गेले आहेत. यातील काही बंधारे आता नादुरुस्‍त झाले आहेत. यातील अनेक बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवले जाते. आतापर्यंत तीन बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आले आहे. नादुरुस्‍त असलेल्‍या बंधाऱ्यांची दुरुस्‍ती पुढील काळात केली जाणार आहे. याचबरोबर लोखंडी प्लेट्‌सही खराब झाल्‍याने त्‍या पुढील काळात बदलल्‍या जाणार आहेत.

एकूणच गेल्‍या अनेक वर्षापासून रखडलेल्‍या नरडवे प्रकल्‍पाच्या पूर्णत्‍वाची साऱ्यांनाच प्रतिक्षा आहे. नरडवे प्रकल्‍पामध्ये घळभरणी होवून पाणीसाठा झाल्‍यास कणकवली, कुडाळ आणि मालवण तालुक्‍यातील अनेक गावांना त्‍याचा लाभ होणार आहे. आतापर्यंत वैभववाडी तालुक्‍यातील अरुणा, कणकवली तालुक्‍यातील देवघर या मध्यम प्रकल्‍पांमध्ये पाणीसाठा झाला असून परिसरातील गावांना त्‍याचा लाभ होत आहे. त्‍यामुळेच नरडवे प्रकल्‍पाच्या घळभरणीची प्रतिक्षा आहे. अर्थात त्‍याचबरोबर प्रकल्‍पग्रस्‍तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सुटणेही तेवढेच महत्‍वाचे आहे.

शेतजमिनीच्या बदल्‍यात अनुदानांतर्गत ७० कोटींचे वाटप

नरडवे प्रकल्‍पग्रस्‍तांना राज्‍यशासनाने खास बाब म्‍हणून शेतजमिनीच्या मोबदल्‍यात अनुदानांतर्गत हेक्‍टरी ५० लाख रुपये मंजूर केले होते. त्‍यानूसार संबंधित कुटुंबाना प्रत्‍येकी किमान २० लाख तरी अनुदान मिळणार आहे. त्‍यासाठी १३५ कोटींचे पॅकेज शासनाने पुनर्वसन विभागाकडे जमा केले होते. त्‍यातील आतापर्यंत सुमारे ७० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. नरडवे प्रकल्‍पांतर्गत नरडवेसह पाच गावातील ९६१ कुटुंबे बाधित झाली असून भुसंपादन आणि पुनर्वसन यासाठी सुमारे ५०० कोटींचे वाटप आतापर्यंत झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT