नांदगाव : कणकवली तालुक्यातील नांदगाव बाजारपेठ येथे मंगळवारी परराज्यातील तीन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला असता त्या चोरट्यांना रंगेहाथ स्थानिक ग्रामस्थांनी पकडून कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. यात एका आठवर्षीय मुलाचाही समावेश होता. ही चोरीची घटना मंगळवारी दुपारी 12.30च्या सुमारास घडली.
मंगळवारी तळेरे आठवडी बाजार असताना एकूण पाच चोरटे फिरत असल्याचा संशय होता. यातील एका चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एक मोबाईल तळेरे बाजारपेठेतून चोरी केली. यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा नांदगाव येथे वळवत तेथील मासेविक्री करणाऱ्या महिलेचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या अल्पवयीन चोरट्याने एसटीमध्ये चढणाऱ्या महिलेचे पाकीट चोरण्याचे प्रयत्न केला. याचवेळेस त्या महिलेने प्रसंगावधान दाखवत त्या चोरट्याला पकडत ओरडाओरड केली. ही ओरड ऐकून स्थानिकांनी धाव घेत दोन चोरटे व एक अल्पवयीन सहा वर्षांच्या चोरट्यांला पकडून चांगलाच प्रसाद दिला. याची माहिती मिळताच नांदगाव पोलिस पाटील वृषाली मोरजकर यांनी चोरट्यांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडून कणकवली पोलिस स्टेशनला माहिती दिली.