Accident Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : गणेशोत्सवास गावी येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

नांदगाव येथे कार दुभाजकावर आदळली; एक ठार तर चौघे गंभीर

दिनेश चोरगे

नांदगाव : गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या लाड कुटुंबावर रविवारी अपघाताचा घाला झाला. मुंबई -गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ओव्हर ब्रीजवर चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात कारमधील अनंत दादू लाड (वय ७५, रा. नालासोपारा मूळ रा. आडवली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य चार सदस्य गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास झाला.

ठाणे-बदलापूर येथे राहणारे मोहन लाड व कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या आडवली, ता. मालवण या गावी कारने येत होते. रविवारी सकाळी त्यांची कार नांदगाव ओटव फाटा ओव्हर ब्रीजवर आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटला, कार दुभाजकाच्या संरक्षक कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात कारमधील अनंत दादू लाड, कारचालक मोहन विठोबा लाड (४५), त्यांची पत्नी आरती ऊर्फ मनस्वी मोहन लाड (४०), मुलगा वेदांत मोहन लाड (१९), उदय मोहन लाड (१५, सर्व रा. बदलापूर-ठाणे, मूळ रा. आडवली) हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. पोलिस पाटील वृषाली मोरजकर, सरपंच रविराज मोरजकर,पंढरी वायंगणकर, भूपेश मोरजकर, भाई मोरये, भूषण मोरजकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तर जखमींना नांदगाव प्रा. आ. केंद्र रुग्णवाहिका व जगद्‌गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिकाद्वारे उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र यातील अनंत दादू लाड याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ऐन गणेशोत्सवात शोककळा

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाड कुटुंबीय गावी येत असताना अवघे काही किलोमीटर अंतरावर गाव असताना काळाने घाला घातल्याने शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT