खारेपाटण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महार्गाव खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे -बांबरवाडी एस. टी. बस थांबा येथे एक अवघड वळणावर कलिंगड घेऊन येणारा टेम्पो बुधवारी २९ एप्रिल रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास पलटी झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन कलिंगड मालाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
वाहन चालक ऋतुराज जयराम वेलोडे (२९, रा. चिपळूण-रत्नागिरी) हा पिकअप बेलोरो टेम्पोंत वैभववाडी येथे अडीच टन कलिंगड भरून चिपळूण-सावर्डे येथे जात होता. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे -बांबरवाडी येथे एका अवघड वळणावर त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो जागीच पलटी झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन कलिंगड मालाचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्व कलिंगडाचा पेर महामार्गावर पसरला होता. चालक ऋतुराज याच्याबरोबर एकनाथ तांबे हा टेम्पोत होते. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराला किरकोळ मार लागला..
या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे १ तास विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, शरद गुहाडे यांनी घटनास्थळी भेट देत पलटी झालेला टेम्पो बाजूला करुन विस्कळीत वाहतूक पूर्ववत केली.
एकाच ठिकाणी आठवडाभरात तिसरा अपघात
मुंबई - गोवा राष्ट्रीय महार्गाववर नडगिवे येथे गेल्या आठवडाभरात झालेला हा तिसरा वाहन अपघात आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष न दिल्यास अपघातांची मालिका अशीच सुरू राहिल व त्यामुळे जनतेच्या रोषाला संबंधित अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल. आमचा अंत पाहू नका व मार्गावरील अवघड वळणे ताबडतोब काढा, असा इशारा स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाने प्रशासनाला दिला आहे.