मृत्यू 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : कालेली येथे महिलेच्या मृत्यूचे गूढ!

गळा आवळल्याच्या खुणेने वाढवला संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : मुले नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती, घरात नीरव शांतता होती... मात्र सायंकाळी ४ वा.च्या सुमारास घराचा दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील कालेली येथे ३८ वर्षीय महिलेचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपूर्वा परब (३८) असे या मृत महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यावर आवळल्यासारखी खूण आढळून आल्याने हा प्रकार आत्महत्या आहे की पूर्वनियोजित घातपात, या चर्चेला उधाण आले आहे.

गुरुवारी साय.४ वा.च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेवेळी अपूर्वा घरात एकटीच होती, तिची मुले शाळेत गेली होती. सायंकाळी ती घरात निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आली. उपस्थितांनी तिचा श्वास आणि नाडी तपासली; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासणीत अपूर्वाच्या गळ्यावर कशाने तरी आवळल्याची खूण दिसून आल्याची माहिती आहे. हीच खूण या प्रकरणातील सर्वात मोठे गूढ ठरत असून, मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सध्या कुडाळ पोलिसांनी याप्रकरणी 'आकस्मिक मृत्यू' अशी नोंद केली असली, तरी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

मृतदेह कोल्हापूरला रवाना; अहवालाकडे लक्ष

मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे, यासाठी अपूर्वा यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सीपीआर) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.​आता संर्वाचे लक्ष कोल्हापूरच्या वैद्यकीय अहवालाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT