कणकवली : मतदानासाठी मतदारांनी लावलेली रांग. pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Voting | जिल्ह्यात चार पालिकांसाठी 74.25 टक्के मतदान

धक्काबुक्की, मारहाण आणि पैसे वाटपाच्या तक्रारी; आरोप-प्रत्यारोप

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : कडेकोट पोलिस बंदोबस्तात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण आणि कणकवली या चार नगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान अखेर पार पडले. धगधगता प्रचार झालेल्या या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीही पैशाच्या वाटपाच्या तक्रारी, त्यावरून धक्काबुक्की आणि मारहाणीसारख्या घटना घडल्या.

मालवणमध्ये भाजप पदाधिकार्‍यांची रोख रकमेसह एक कार जप्त केल्यानंतर वातावरण तंग बनले होते; परंतु तिथे मतदान शांततेत पार पडले. कणकवलीमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येला कडवे आरोप-प्रत्यारोप झाले होते; पण कणकवली शहरातही शांततेत मतदान झाले. अर्थात, मालवणनंतर सावंतवाडीतही पैसे वाटपाबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या.

तिथे धक्काबुक्कीही झाली. भाजपचे नेते विशाल परब यांच्या चालकालाही मारहाण झाली. दरम्यान, शिंदे शिवसेनेने परब यांच्या चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली. आता निकाल बुधवारऐवजी 21 डिसेंबर रोजी लागणार असल्याने मतदानानंतर वातावरण काहीसे शांत बनले आहे.

आता कोण निवडून येणार?

‘एक्झिट पोल’ बाहेर न पडू शकल्यामुळे मतदारांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी कल जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारही नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेनेची युती झाली नव्हती. किंबहुना, महाविकास आघाडीही झाली नव्हती.

त्यामुळे वेंगुर्ले आणि सावंतवाडी या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी चौरंगी लढत झाली होती. सावंतवाडीतही अशीच चौरंगी लढत लढली गेली. मालवणात मात्र भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना, अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. कणकवलीत मात्र लक्षवेधक अशी भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी, अशी रंगतदार लढत झाली आहे.

मतदानासाठी रांगाच रांगा

सकाळी 7.30 वा. मतदानाला सुरुवात झाली. शहरातील नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली. शासकीय सुट्टी जाहीर केल्यामुळे सरकारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचारी सकाळच्या सत्रातच रांगेत उभे होते.

उमेदवारांची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे एक-एक मतदार बाहेर काढण्याच्या कामाला उमेदवार लागले होते. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांचे बुथ मांडण्यात आले होते. अगदी वयोवृद्ध मतदारसुद्धा मतदान करण्यासाठी येत होते. कणकवली शहरामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

तितकाच बंदोबस्त मालवण शहरामध्येही होता. सावंतवाडी, वेंगुर्ला शहरामध्येही पोलिस बंदोबस्तात शांततेत मतदान झाले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी मतदारांचा ओघ थोडा कमी होता. मात्र 4 वाजल्यानंतर तो पुन्हा वाढला. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदानाची वेळ संपली तरीदेखील काही मतदार रांगेत उभे होते.

मुंबईतील मतदार आणले

मुंबई व इतर शहरात राहणारे मतदारही या निवडणुकीत आणण्यात आले होते. अशा मतदारांचे मतदान वेळेत करून घेण्याकडे कार्यकर्त्यांचा लक्ष होता. सुरुवातीला सिंधुदुर्गातील या चारही नगरपालिकांच्या निवडणुका शांततेत, सुरळीत आणि फारसा गाजावाजा न होता पार पडतील असा अंदाज व्यक्त होत होता.

परंतु मतदानाचा दिवस जसा जवळ येत गेला तसे वातावरण तापू लागले. सुरुवातीला केवळ आणि केवळ विकासकामांचा मुद्दा पुढे आणला गेला. मात्र नंतर आरोप-प्रत्यारोपांना फार मोठा रंग चढला. त्यात आमदार निलेश राणे यांनी मालवणात भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या घरात पैसे वाटपासंबंधीचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोपांची राळ उठली.

2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगून वेगळेच संकेत दिले. आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटप प्रकरणामागे रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप वारंवार केल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले या तीन ठिकाणी प्रचाराच्या सभा घेतल्या.

मात्र रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार वगळता भाजपचे कोणतेही मोठे राज्यस्तरावरील नेतृत्व प्रचारासाठी आले नव्हते. भाजपकडून निवडणूक यंत्रणेची संपूर्ण कमान भाजप नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसले.

आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता

युती व्हावी अशी इच्छा भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी बोलून दाखवली होती. मात्र युती झाली नाही. प्रचाराच्या कालावधीत खासदार नारायण राणे दोनवेळा सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले. मात्र त्यांनी जाहीर प्रचारामध्ये भाग घेतला नाही.

भाजपाने सुरुवातीपासून स्वबळाची घोषणा सुरुच ठेवली होती. तर भाजपने जाणीवपूर्वक युती केली नाही असा आरोप शिंदे शिवसेनेकडून सतत होत होता. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीचा निकाल आता 21 तारखेला लागणार असल्याने वातावरण एकदम शांत बनले आहे. त्याचवेळी उत्सुकताही लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT