देवगड ः कोकण किनारपट्टीवर हिवाळ्याच्या हंगामात येणाऱ्या स्थलांतरित सिगल पक्ष्यांचे आगमन झाले असून देवगड तालुक्यातील मुणगे-आडवळवाडी समुद्रकिनारी सध्या या पक्ष्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. शुभ्र रंगातील सिगल पक्ष्यांचे थवे समुद्रकिनारी मुक्त संचार करत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यटकांचे लक्ष वेधले जात आहे.
दरवर्षी थंडीच्या काळात सिगल पक्षी रशिया तसेच उत्तर युरोपातील बर्फाच्छादित प्रदेशातून सुमारे पाच ते सहा हजार किलोमीटरचा दीर्घ प्रवास करून कोकण किनारपट्टीवर स्थलांतर करतात. अनुकूल हवामान, मुबलक अन्नसाठा आणि शांत किनारे यामुळे हे पक्षी काही काळासाठी येथे मुक्काम करतात.सिगल पक्ष्यांच्या आगमनामुळे मुणगे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढली असून अनेकजण या पक्ष्यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच छायाचित्रणासाठी समुद्रकिनारी येत आहेत. समुद्राच्या लाटांवर उडणारे आणि वाळूत विसावलेले सिगल पक्ष्यांचे थवे निसर्गसौंदर्यात भर घालत आहेत. मुणगे समुद्रकिनारी दिसणारा सिगल पक्ष्यांचा मनमोहक थवा देवगड-पडवणे येथील युवा छायाचित्रकार मिलिंद कीर यांनी कॅमेराबद्ध केला असून त्यांच्या छायाचित्रांमुळे या स्थलांतरित पक्ष्यांचे सौंदर्य अधिक ठळकपणे समोर आले आहे.