कुडाळ : सिंधुदुर्ग विमानतळावरून शनिवारी सकाळी मुंबईकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या विमानात ऐनवेळी तांत्रिक बिघाड उद्भवल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. विमानात बसल्यानंतर एसी सुरू नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. काही वेळाने पुन्हा विमानात बसविण्यात आले; मात्र पुन्हा तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत प्रवाशांना दुसऱ्यांदा विमानातून उतरवण्यात आले. अखेर विमानाचे उड्डाण अनिश्चित झाल्याने प्रवाशांना लक्झरी बसने गोव्यातील मोपा विमानतळावर नेण्यात आले व मुबंईला पाठविण्यात आले.
सिंधुदुर्गहून मुंबईला जाण्यासाठी प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. विमानातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रवासी विमानात बसले. मात्र, विमानाचा एसी सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा विमानात बसविण्यात आले. मात्र, पुन्हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. त्यामुळे नेमका बिघाड काय आणि विमानाचे उड्डाण कधी होणार, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी गोव्याहून इंजिनिअरला पाचारण करण्यात आले. इंजिनिअरकडून तपासणी झाल्यानंतरच विमान उड्डाणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना लक्झरी बसने गोव्यातील मोपा विमानतळावर हलविण्यात आले व तिथुन मुबंईला पाठविण्यात आले. या प्रकारामुळे वृद्ध प्रवासी, कुटुंबासह प्रवास करणारे आणि पहिल्यांदाच सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागला. विमानाच्या उड्डाणाबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
सिंधुदुर्ग विमानतळाची सेवा काही महिन्यांच्या खंडानंतर नव्याने सुरू झाली असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांच्या विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणच्या पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विमानसेवेत सातत्य राखण्याबरोबरच विमानाची तांत्रिक सज्जता, पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि प्रवाशांशी प्रभावी संवाद याकडे विमान कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांची मौनाची भूमिका
या प्रकाराबाबत चिपी येथील विमान कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलणे टाळले. तर कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी (पीआरओ) संपर्क साधला असता, याबाबत मला आताच समजले,असे सांगण्यात आले. त्यामुळे विमानातील तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मोपा विमानतळावर हलविण्याचा निर्णय आणि पुढील प्रवासाच्या व्यवस्थेबाबत कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकले नाही. प्रवाशांची गैरसोय झालेली असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.