ओरोस : एसटी महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विविध स्तरातून आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धिस दिली आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे
महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा
या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात एसटी प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.