सावंतवाडी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत सुरू करण्यात आलेल्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) वितरण आणि नोंदणी प्रक्रियेत सध्या प्रचंड सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. स्मार्ट कार्ड वितरणातील ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संबंधित कार्यालयांमध्ये कार्ड शॉर्टिंगचे (वर्गीकरण) काम सुरू असल्याने नवीन नोंदणी आणि कार्ड वितरण पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी विनाकारण कार्यालयाबाहेर रांगा लावून गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. महामंडळाकडून कार्ड नोंदणी व वितरणाची वेळ स. ९.३० ते संध्या. ६.३० अशी निश्चित करण्यात आली असून, ६.३० वाजल्या नंतर कोणतीही नवीन नोंदणी स्वीकारली जाणार नाही. एनसीएमसी कार्ड सक्तीचे एसटी प्रवासात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाची (हाफ तिकीट) सवलत कायम आहे. मात्र, महिलांसाठी आता पूर्ण तिकीट लागू असणार आहे. प्रवासादरम्यान आता केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळणार नसून, प्रवाशांकडे 'एनसीएमसी कार्ड' असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अधिक रक्कमेची वसुली आणि मेसेजचा घोळ पूर्वी सिटी कॅश कंपनीमार्फत अवघ्या ५५ रुपयांत कार्ड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, आता हेच कार्ड मिळवण्यासाठी प्रवाशांकडून १९९ रुपये अधिक २० रुपये अशी अधिकची रक्कम उकळली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. हे कार्ड ३१ ऑगस्टपूर्वी देणे आवश्यक होते, कारण १ सप्टेंबरपासून प्रवासासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
दुसरीकडे, 'एबिक्स कॅश' (Ebix Cash) एजन्सीकडून प्रवाशांच्या मोबाईलवर "तुमचे कार्ड तयार असून घेऊन जा," असा मेसेज पाठवला जातो. मात्र, नागरिक केंद्रावर पोहोचल्यावर "कार्ड तयार नाही" असे सांगून माघारी धाडले जात आहे.
वेळेचा अपव्यय अन् वाहकांशी हुज्जत एनसीएमसी कार्डच्या या गोंधळामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात असून, तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. प्रवासात कार्डवरून वाहक (कंडक्टर) आणि प्रवाशांमध्ये रोज वादाच्या ठिणग्या उडत असून, भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने व संबंधित कंत्राटदार एजन्सीने या तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून कार्ड वाटप पूर्ववत करावे, अशी मागणी होत आहे.