कणकवली : एसटी महामंडळाने जेष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारी प्रवाशांना १ सप्टेंबरपासून सवलतीच्या तिकीटासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य केले आहे. परंतु सिंधुदुर्गात अपुऱ्या एजंटमुळे अनेकांना या कार्डची नोंदणी करता आलेली नाही तसेच ज्यांनी नोंदणी केली त्यांना कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे मंगळवार पासून प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले. काहीं जणांकडे कार्ड असूनही रिचार्ज न बसल्याने त्यांना पुर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. राज्यभरात हा गोंधळ निर्माण झाल्याने अखेर एसटी महामंडळाने सारवासारव करत काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा दिला आहे. नोंदणी करुनही कार्ड न मिळालेल्यांना मॅन्युअल तिकीटावर सवलतीच्या प्रवासास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या अनुषंगाने काही सूचना करण्यात आल्या आहेत.
ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी प्रवासाचे तिकीट ऑनलाईन आरक्षित केले होते, अशा प्रवाशांना एक वेळची खास बाब म्हणून एनसीएमसी कार्ड अनिवार्य न करता प्रवाशांना सदर आरक्षित तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवास अनुज्ञेय करण्यात यावा. ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड नोंदणीकरण केले आहे, परंतु एनसीएमसी कार्ड प्राप्त झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्ड नोंदणी पावती ग्राह्य धरून सवलतीच्या मॅन्युअल तिकीटावर प्रवास करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुभा देण्यात आली आहे.
प्रवाशांना परवडेल अशा दरात स्वस्त व सुरक्षित धार्मिक पर्यटन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रा.प. महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत श्रावण महिना सुरु असल्याने या कालावधीत विभागांद्वारे तिर्थाटनांकरिता विशेष बससेवा चालविण्यात येतात. १२सप्टेंबर पर्यंत सदर विशेष बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना रा.प.च्या पूर्वीच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवास सवलत अनुज्ञेय आहे.
गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या ग्रुप बुकींग मधील ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य न करता प्रवाशांना सदर आरक्षित केलेल्या तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवास अनुज्ञेय करण्यात आला आहे. ज्या लाभार्थ्यांकडे ॲक्टीव एनसीएमसी कार्ड आहे त्यांस सदर कार्ड मधूनच सवलतीचे तिकीट देण्यात यावे. ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आल्याने प्रवासी संख्येमुळे एनसीएमसी कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर वाढलेल्या हिटस् मुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवासा दरम्यान सवलतीचे तिकीट देण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रवासात तक्रारी निर्माण होत आहेत. त्यामुळे १४ सप्टेंबर पर्यंत सदर सवलतधारी प्रवाशांना सवलतीच्या मॅन्युअल तिकीटावर प्रवास करण्यास अनुमती देण्यात आली आहे.