मुंबई : बैठकीत बोलताना ना. नितेश राणे. सोबत अधिकारी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या निर्णय मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी आणि रोजगारालाही चालना मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील जलवाहतुकीसाठी करलाई - तारकर्ली, काळी -देवबाग, देवबाग-निवती, विजयदुर्ग अनुसरे- दांडे, आरोंदा - किरणपाणी हे फेरीबोटीसाठी प्रस्तावित मार्ग आहेत. सुरुवातीला करलाई - तारकर्ली या जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या दोन बंदरादरम्यान रस्ता प्रवासाठी दीड ते दोन तास लागतात. मात्र जलमार्गाने हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन पर्यटन, स्थानिक वाहतूक आणि किनारपट्टीवरील आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. बांधा आणि चालवा (बीओओ) किंवा बांधा, चालवा आणि हस्तातरित करा (बीओटी) किंवा पीपीपी यापैकी योग्य तत्त्वावर नवीन फेरीबोट बांधणी, कार्यान्वयन व देखभाल करण्याच्या प्रस्‍ताव प्राका इंजिनिअरिंग शिपयार्ड तसेच इतर कंपन्यांकडून विस्तृत सादरीकरण करण्यात आले.

प्रस्तावित फेरीची संकल्पना २० मीटर लांब आणि ७.५ मीटर रुंद, एकेरी डेकची असून, संकल्पनात्मक आराखड्यानुसार त्यात प्रवासी, चारचाकी वाहने आणि दुचाकी वाहून नेण्याची क्षमता प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे खासगी क्षेत्राच्या सहभागातून जलवाहतूक सेवा अधिक नियमित व आधुनिक करण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन अँड इक्विपमेंटचे प्रोप्रा. प्रशांत व्यंकटेश, प्रियेश कामत, अनुप कर्णिक, अमित पोडोस्कर, साहिल देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT