वैभववाडी : पारंपरिक भातशेतीतील अतोनात श्रम, वाढता खर्च आणि मजुरांच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी वैभववाडी तालुक्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सामूहिक शेतीचा मार्ग धरला आहे. कृषी विभाग आणि 'कोकण व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी' (FPC) यांच्या पुढाकाराने तिथवली येथे तब्बल १० एकर क्षेत्रावर 'एसआरटी' (सगुणा पुनरुत्पादन तंत्रज्ञान - SRT) पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला.
हा अभिनव प्रयोग 'पाणी फाऊंडेशन फार्मर कप' (Water Foundation Farmer Cup) मध्ये सक्रिय भाग घेतलेल्या तिथवली येथील 'Red Soil शेतकरी गट' यांच्या १० एकर क्षेत्रावर सामूहिकरीत्या राबवण्यात आला आहे. या प्रयोगासाठी खांबाळे येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश कदम यांच्या यशस्वी 'एसआरटी' पॅटर्नचा आधार घेण्यात आला आहे.
या मोहिमेच्या उद् घाटन प्रसंगी आगामी काळात शेतीला नवी दिशा देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, कोकण व्हिजन FPC चे अध्यक्ष मंगेश कदम, माजी सभापती नासीर काझी, उप कृषी अधिकारी आनंदा पाटील, तिथवलीचे ग्रामसेवक कोलते, प्रगतिशील शेतकरी गुलझार काझी तसेच कृषीसेवक शामबाला नलवडे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या सामूहिक प्रयोगासाठी 'साईराज' या संकरित (Hybrid) भात जातीची निवड करण्यात आली आहे. 'साईराज' ही जात अधिक फुटवे देणारी, लोंब्यांची लांबी जास्त असणारी आणि दर्जेदार उत्पादनासाठी ओळखली जाते. 'एसआरटी' तंत्रज्ञानासोबत या आधुनिक जातीची सांगड घातल्यामुळे यंदा तिथवली परिसरात भाताचे विक्रमी उत्पादन मिळण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
कृषी विभागाच्या ‘अवजार बँके’चा आणि अनुदानाचा आधार
या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत कृषी विभागामार्फत 'कोकण व्हिजन FPC' कंपनीला ६० टक्के अनुदानावर आधुनिक शेती अवजारे मंजूर करण्यात आली आहेत. ही यंत्रसामग्री केवळ कंपनीपुरती मर्यादित न ठेवता सार्वजनिक उपयोगासाठी 'अवजार बँक' म्हणून खुली करण्यात आली आहे. याच अवजार बँकेतील ट्रॅक्टर आणि बीबीएफ (BBF) यंत्राचा वापर करून तिथवली येथे थेट गादी वाफे तयार करून भात टोकण करण्यात आली. या सार्वजनिक सुविधेमुळे तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी आणि सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी दोघांचाही आर्थिक फायदा होणार असून त्यांना कमी खर्चात आधुनिक शेती करणे सुलभ झाले आहे.
आधुनिक शेतीचा नवा अध्याय
'कोकण व्हिजन FPC' ने कृषी विभागाच्या सहकार्याने वैभववाडी तालुक्यात भात लागवडीसोबतच हळद लागवड व प्रक्रियेतही मोठी प्रगती केली आहे. या अवजार बँकेच्या बळावर आता संपूर्ण वैभववाडी तालुक्याला आधुनिक शेतीचा ब्रँड बनवण्याचा कंपनीचा मानस आहे.