देवगड ः नाडण-पुजारेवाडी येथील बेपत्ता आत्माराम विठोबा मोंडे (78) यांचा मृतदेह वाडा पुलानजीक गटारात रविवारी दुपारी 3.45 वा. च्या सुमारास आढळून आला. ते बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा संदेश आत्माराम मोंडे (47) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली होती. नाडण-पुजारेवाडी येथील आत्माराम विठोबा मोंडे हे 6 जून रोजी पहाटे 6 वा. च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. ते घरी परत आले नाहीत व शोधाशोध करूनही ते सापडले नाहीत. ते बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने देवगड पोलिस स्थानकात दिली होती.
रविवार 8 जून रोजी वाडा आंबेडकर चौक येथील पुलाजवळील गटारात देवेंद्र पुरूषोत्तम वाडेकर यांना पुरूष जातीचा मृतदेह निदर्शनास आला. त्यांनी घटनेची कल्पना वाडा पोलिसपाटील महेंद्र मांजरेकर यांना दिली. पोलिसपाटील मांजरेकर यांनी याची माहिती देवगड पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला.
दरम्यान 6 जून रोजी बेपत्ता झालेले आत्माराम मोंडे यांचा मुलगा संदेश याला घटनास्थळी बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. आत्माराम मोंडे हे मनोरूग्ण होते.त्यांची मानसिक स्थिती बिघडत असल्याने त्यांच्यावर रत्नागिरी मनोरूग्णालयामार्फत उपचार सुरू होते अशी माहिती त्यांचा मुलगा संदेश यांने फिर्यादीत दिली आहे.
दरम्यान देवगड ग्रामीण रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. संदेश मोंडे याच्या फिर्यादीनुसार, घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास पो.हवालदार आशिष कदम करीत आहेत. आत्माराम मोंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे व विवाहित मुली असा परिवार आहे.