कणकवली ः शिंदे शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजप नेते खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना मागे काय झालं ते विचारू नका, आता कटूता संपली. खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात जि.प. आणि पं.स निवडणुका भाजप आणि शिवसेना युती करून लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
खा. राणे यांच्या भेटीवेळी माजी आ. प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना नेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब, महिला अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, आज आम्ही खा. नारायण राणे यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित भेटलो. खा. नारायण राणे यांच्याबरोबर तसेच मंत्री नितेश राणे, आ. नीलेश राणे यांच्याशीही आपली चर्चा झाली आहे. जिल्ह्यात युती करून निवडणूका लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नावर बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी पदाधिकारी एकत्र बसून निर्णय घेतील. कुडाळ- मालवण मतदारसंघाबाबत आ. नीलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे निर्णय घेतील. तर कणकवली मतदारसंघाबाबत पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे आदी खा. राणे यांच्या उपस्थितीत चर्चा करून निर्णय घेतील. संभाव्य बंडखोरीबाबत विचारले असता खा. राणे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांची कशी समजुत काढायची हे आम्हाला माहिती आहे,असे ते म्हणाले. मुंबईतील महायुतीच्या विजयाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत मुंबईचा महापौर मराठीच होईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील असे मंत्री सामंत म्हणाले.