सिंधुदुर्गनगरी ः वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नी सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी चर्चा करताना ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत, राजन तेली, इतर पदाधिकारी व शिवसैनिक.  (छाया ः संजय वालावलकर)
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | मेडिकल कॉलेजमधील धुलाईचे बिल 56 लाख!

महाविद्यालयाच्या कारभाराची ठाकरे शिवसेनेकडून वैद्यकीय सहसंचालकांसमोर पोलखोल

पुढारी वृत्तसेवा

ओरोस ः शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची आरोग्य सहसंचालकांसमोर पोलखोल केला. या महाविद्यालयातील 80 टक्के बेड रिकामी आहेत, तरीही रुग्णालयातील कपडे धुण्याचे बिल तब्बल 56 लाख रु. झाले. अशा अनेक प्रकरणांचा माजी आ. वैभव नाईक, माजी आ. राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांच्या समोर पाढा वाचला. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी या पदाधिकार्‍यांनी सहसंचालकांकडे मागणी केली आहे.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे मंगळवारी सिंधुदुर्गनगरीत आल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात भेट घेत त्यांच्यासमोर वैद्यकीय महाविद्यालयातील गैर कारभाराचा पाढा वाचला. तसेच याबाबतचे लेखी निवेदन डॉ. सापळे यांना दिले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या हजेरी बुकवर230 कंत्राटी कर्मचार्‍यांची नावे आहेत.

मात्र त्यातील केवळ 150 कमर्चारी प्रत्यक्षात कामावर उपस्थित असतात. इतर 100 कमर्चार्‍यांच्या खोट्या सह्या मारून त्यांच्या पगाराचे पैसे काढून भ्रष्टाचार केला जात आहे, याकडे वैभव नाईक व पदाधिकार्‍यांनी डॉ. सापळे यांचे लक्ष वेधले. या महाविद्यालयाशी संलग्न रूग्णालयाची दैनंदिन ओपीडी 100 पेक्षा कमी असताना आणि रुग्णालयातील 80 टक्के बेड रिकामी असताना रुग्णालयातील कपडे धुलाईचे बील तब्बल 56 लाख रु. आले आहे. त्यामुळे हे महाविद्यालय भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचेे स्पष्ट होते,असा आरोप शिवसेना शिष्टमंडळाने केला.

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 4 अध्यापक कार्यरत असून त्यातीलच डॉ. अनंत दवंगे यांना अनुभव नसताना अधिष्ठाता पदावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याकडे सहसंचालकांचे लक्ष वेधण्यात आले. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय परिस्थिती सुधारा, अशी मागणी या शिष्टमंडळाने डॉ. सापळे यांच्याकडे केली. यावर डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालय व रूग्णालयातील त्रुटी व समस्यांचा आढावा घेऊन येत्या 15 दिवसात जनरल, आयसीयू सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, शिवसेना ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालणकर, भगवान परब व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात वारंवार आंदोलने, धडक मोर्चे काढूनही वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटी व समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्याकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत अथवा ठोस कार्यवाही केली जात नाही, अशी तक्रार शिवसेना शिष्टमंडळाने सहसंचालक यांच्याकडे केली. येथे रुग्णच येत नसतील तर कपडे कोणाचे धुतले जातात? असा सवाल केला. रुग्णालयात आयसीयूचा एकही बेड नाही, गेली 5 वर्षे सीआर्म मशीन बंद आहे. अध्यापक, वैद्यकीय अधिकारी, प्रशाकीय अधिकारी,तांत्रिक कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. मात्र 230 कंत्राटी पदे कागदोपत्री भरण्यात आली आहेत.साधनसामुग्री उपलब्ध नाही.

रुग्ण व गरोदर मातांना सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बहुतांश रुग्ण गोवा-बांबुळी आणि खाजगी रुग्णालयात पाठवले जातात. साफसफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी असूनही परिचर कर्मचार्‍यांकडून साफसफाई करून घेतली जाते. प्रत्यक्षात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना योग्य पगार दिला जात नाही. अशा अनेक समस्यांचा पाढा सहसंचालकांसमोर मांडण्यात आला.कंत्राटी कर्मचारी प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात,त्यामुळे त्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सफाई कर्मचारी दोन महिने पगाराविना

सफाई कर्मचार्‍यांचे दोन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही, अशी तक्रार कर्मचार्‍यांनी केल्याने शिवसेना शिष्टमंडळाने स्मार्ट इंडिया कंपनीच्या सुपरवायझरला धारेवर धरून कंपनीच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली. सफाई कर्मचार्‍यांना तत्काळ पगार देण्याच्या सूचना करण्यात आल्या, अन्यथा पुण्यातील कार्यालयात धडक देऊ, असा इशारा दिला.

ठाकरे शिवसेना पदाधिकार्‍यांनी नोंदवलेले आक्षेप

  • मस्टरवर 230 कंत्राटी कर्मचारी, मात्र केवळ 150 कर्मचारी हजर.

  • रुग्णालयात आयसीयूचा एकही बेड नाही.

  • गेली 5 वर्षे सीआर्म मशिन बंद आहे.

  • रुग्ण व गरोदर मातांना सकस आहार मिळत नाही.

  • बहुतांश रुग्ण गोवा-बांबुळी आणि खासगी रुग्णालयात पाठवले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT