देवगड : बागायतदारांच्या २३ मार्च रोजी नांदगाव येथे होणाऱ्या हायवे चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील १३ प्रमुख लोकप्रतिनिधी व आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलीस प्रशासनाकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.
यावर्षी नैसर्गिक संकटामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बागायतदारांनी एकजुटीने जाहीर मेळावे, मोर्चा काढून शासनाकडे आपली कैफियत मांडली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बागायतदारांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाही काढून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता.
दिलेल्या मुदतीत शासनाने मागण्या मान्य न केल्यास २३ मार्च रोजी मुंबई- गोवा हायवेवर नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा बागायतदारांनी दिला होता. त्यानुसार २३ मार्च रोजी हे आंदोलन नांदगाव येथे होत असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एकूण १३ प्रमुख लोकप्रतिनिधी व आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे, प्रभारी होमगार्ड समादेशक प्रसाद कदम, होमगार्ड सुधाकर नाईकधुरे, प्रदीप राणे, श्रीराम साईम, दत्ताराम झाजम आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.