देवगड : आंबा बागायतदारांचे विमा नुकसानभरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकार्यांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नीतेश राणे यांनी देवगड येथे झालेल्या बैठकीत दिले. बागायतदार शेतकर्यांच्या सर्व प्रश्नांना महायुती सरकार न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाच्यावतीने आंबा, पिकविमा आदी प्रश्नांबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी इंद्रप्रस्थ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार अॅड.अजित गोगटे, फळबागायती शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रूमडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक-नवरे, तहसीलदार रमेश पवार, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, प्रकाश राणे, डॉ.अमोल तेली आदी उपस्थित होते.
शेतकर्यांचा वतीने फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास रूमडे यांनी प्रास्ताविक करून समस्या मांडल्या. बैठकीदरम्यान उपस्थित बागायतदार शेतकर्यांनी पीक विमा योजनेत येणार्या अडचणी, वेदर स्टेशनवरून तयार होणार्या अहवालातील त्रुटी, विमा हप्त्याच्या तुलनेत अपुरी भरपाई मिळत असल्याबाबत तक्रारी मांडल्या. चर्चेत आंबा बागायतदार शेतकरी चंद्रकांत गोईम, रामदास अनभवणे, श्रीकांत नाईकधुरे, संदेश मालवणकर, प्रकाश राणे, निलेश पेडणेकर, इम्रान साटविलकर आदींनी भाग घेतला. यावेळी त्यांनी खावटी कर्जे, रायपनिंग चेंबर, पीक विमा, वेदर स्टेशन, कीटकनाशके आणि खते, बँक कर्जे याबाबत सविस्तर चर्चा केली. दापोली कृषी विद्यापीठा संचालक मंडळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन अशासकीय प्रतिनिधी घ्यावेत आणि वेदर स्टेशनवरील अहवालाची खातरजमा करताना स्थानिक व्यक्तीची सही आवश्यक ठेवावी,अशा सूचना माजी आमदार अॅड.अजित गोगटे यांनी मांडल्या.
विलास रूमडे यांनी पीक विमा मिळण्याचा कालावधी 15 मे ऐवजी 30 मे पर्यंत करावा, हवामानावर आधारित फळ पीक विम्याचे निकष हवामानातील बदलानुसार कोकण विभागासाठी स्वतंत्र असावेत. ते राज्यातील आंबा पिकाच्या सध्याचा प्रचलित निकषाप्रमाणे नसावेत, फळ पिकविमा कालावधी 1 ऑक्टोबर ते 31 मे पर्यंत करण्यात यावा आदी मागण्या मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केल्या. ना.राणे यांनी शेतकर्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
नांदगाव येथे लवकरच मार्केटयार्ड सुरू होणार असून ते सुरू झाल्यावर दराचा प्रश्न आणि आंबा वाहतुकीच्या समस्या मार्गी लागतील असेही सांगितले. शेतकर्यांचा प्रश्नावर कोणतेही फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीवर भर राहील, असे राणे यांनी सांगितले. गिर्ये आंबा संशोधन केंद्र अद्ययावत करा, अशी मागणी श्री. गोगटे यांनी केली.