दोडामार्ग : मणेरी-कुडासे मार्गावर धावत्या मारुती ८०० कारने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने चाल प्रसंगावधान राखत वेळीच कारमधून बाहेर पडल्याने अप्रिय घटना घडली नाही.
कार दोडामार्ग ते मणेरी-कुडासे असा प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अचानक कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सुरक्षितपणे कारमधून बाहेर पडला. चालक कारमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला. आगीने काही वेळातच संपूर्ण कारला वेढले. त्यामुळे कार जळून पूर्णपणे खाक झाली. दरम्यान, कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.