kidnapping case Pudhari File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| ऊसतोडीसाठीचे उसने पैसे परत न केल्याने अपहरण

जत तालुक्यातील तिकोंडी येथे नेऊन मारहाण; कुडाळ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : उसतोडीच्या कामासाठी हातउसने घेतलेली रक्कम परत केली नाही, या कारणावरून कुडाळ शहरातील एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला सांगली जिल्ह्यातील जत-तिकोंडी येथे नेऊन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक बाबींच्या आधारे जत परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीसह अपहरण झालेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही कारवाई करण्यात आल्याने कुडाळ पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.

या प्रकरणी जयवंत कोंडीबा करे (४०, रा. तिकोंडी, जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुनिता पवार ( रा. पानबाजार, कुडाळ) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. फिर्यादी सुनिता पवार यांचे पती प्रकाश रमेश पवार (३८) यांनी उसतोड कामासाठी जयवंत करे याच्याकडून हातउसने रक्कम घेतली होती. ही रक्कम परत न केल्याच्या कारणावरून २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वा.च्या सुमारास कुडाळ बसस्थानक परिसरातून प्रकाश पवार यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना जत- तिकोंडी येथे नेण्यात आले. तेथे प्रकाश पवार यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान .पती बेपत्ता झाल्यानंतर सुनिता पवार यांनी याबाबत कुडाळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

तांत्रिक तपासाच्या आधारे जतकडे धाव

घटना कुडाळ शहरातून घडल्याने तसेच अपहरण झालेल्या व्यक्तीला जिल्ह्याबाहेर नेण्यात आल्याने पोलिसांसमोर त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत तपासाला वेग दिला. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना झाले.जत परिसरात पोलिसांनी आरोपी जयवंत करे याचा ठावठिकाणा शोधून काढला. त्याचबरोबर अपहरण करण्यात आलेले प्रकाश पवार यांचाही शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अखेर ३ ऑक्टोबर रोजी आरोपी जयवंत करे आणि प्रकाश पवार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कुडाळ येथे आणले.

आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

कुडाळ येथे आणल्यानंतर जयवंत करे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शेष मोरे, प्रमोद काळसेकर, रूपेश गुरव तसेच महिला पोलीस सुप्रिया भागवत यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत आणि कुडाळ पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT