मालवण : तालुक्यातील वायंगणी गावची त्रैवार्षिक देवपळण व गावपळण सोमवार 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निमित्त पुढील तीन दिवस व तीन रात्री गाव निर्मनुष्य होणार आहे. रविवारी 22 फेब्रुवारी रोजी दुपार नंतर देवपण करून गावच्या वेशीवर म्हणजे भंडारवाडी -दांडवळ येथील श्री विठ्ठला देवी मंदिराच्या बाजूला गावच्या चाळयाला भक्ष्य देऊन दैवीशक्तींना गाव तीन व दिवस तीन रात्री निर्मनुष्य करुन दैवी शक्तींना गावात पहारा देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
सोमवार 23 फेब्रुवारी रोजी पहाटे देव कोणताही गाजावाजा न करता चिंदर -सडेवाडी येथील सिद्धमहापुरुष मंदिराच्या मागच्या बाजूला बारा पाच मानकरी वतनदार रयतेसह पळून येऊन ढोलताशा, फटाके वाजवून गावातील लोकांना देव पळून आल्याची सूचना करणार आहेत. त्या नंतर दुपारी 2.30 वा.पर्यंत संपूर्ण गाव गुरे, ढोरे यांच्या सह वेशीबाहेर स्थिरावणार असून तीन दिवसांनंतर देवाच्या कौल प्रसादा नंतर गाव भरणार आहे.