Drowning death Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Drowning Case : तारकर्ली समुद्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह दांडी येथे सापडला

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

मालवण : तारकर्लीच्या समुद्रात गुरुवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या समर्थ गणेश कर्पे (२२, रा. आंबेगाव पुणे) या पर्यटक युवकाचा मृतदेह शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवण-दांडी येथील पद्मगड नजीकच्या किनाऱ्यावर सापडून आला. मालवण पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून समर्थ कर्पे याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दोन दिवसापूर्वी तारकर्ली येथील एमटीडीसी निवास केंद्रासमोरील समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना समर्थ गणेश कर्पे व ऋषभ रविकिरण कदम (२७, रा. धनकवडी, पुणे) हे दोघे तरुण लाटेच्या तडाख्याने समुद्रात ओढले गेले. ऋषभ कदम याने किनारा गाठल्याने स्थानिकांनी त्याला समुद्राबाहेर काढल्याने तो बचावला होता. मात्र समर्थ कर्पे हा तरुण समुद्रात बेपत्ता झाला होता. गेले दोन दिवस स्थानिक मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक तसेच मालवण पोलिस यांच्याकडून समुद्रात समर्थचा शोध घेण्यात येत होता. यासाठी पोलिसांनी किनारपट्टीवरील नागरिकांना आवाहनही केले होते. तसेच पोलिसांनी मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याने समुद्रात त्याचा शोध घेतला. मात्र समर्थ हा सापडून आला नव्हता.

शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवण-दांडी येथील पद्मगड नजीकच्या किनाऱ्यावर तारकर्लीच्या दिशेने एक मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस उपनिरीक्षक गणेश माने व सहकारी यांनी त्याठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. समर्थ याचे मामा महेश वैद्य (रा. अकोले, जि. अहिल्यानगर) हे मालवणात आल्याने त्यांच्या मार्फत मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. मृतदेहावरील कपडे व गळ्यात असलेला मोबाईल यामुळे समर्थ कर्पे याची ओळख पटली. समर्थ याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT