Drowning incident  Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : तारकर्ली समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला

एकाला वाचवण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

मालवण : तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावत दुसऱ्या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढले. समर्थ गणेश कर्पे (२२, रा. आंबेगाव, पुणे) असे पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, ऋषभ रविकिरण कदम असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषभवर सध्या मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे येथील 'रेवती एन्टरप्रायजेस'मध्ये कामाला असलेले ऋषभ कदम आणि समर्थ कर्पे हे दोघे १९ मे रोजी सिंधुदुर्गात आले होते. समाजकल्याण विभागातील आपले कार्यालयीन काम आटोपून ते मालवण येथे पर्यटनासाठी थांबले होते. गुरुवारी दुपारी हे दोघेही तारकर्ली येथील एमटीडीसी रिसॉर्टसमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरले.

समुद्रात आंघोळ करत असताना अचानक पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून किनाऱ्यावरील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने समुद्रात उड्या मारल्या. ग्रामस्थांनी ऋषभ कदम याला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, मात्र समर्थ कर्पे हा लाटांच्या तीव्र तडाख्यात सापडल्याने खोल पाण्यात वाहून गेला आणि बेपत्ता झाला. पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी संकेत तारी, दत्तराज चव्हाण, वैभव खोबरेकर, महेंद्र चव्हाण आणि वैभव सावंत या स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे एका पर्यटकाचे प्राण वाचू शकले.

पाण्यातून बाहेर काढलेल्या ऋषभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी '१०८' रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला होता. मात्र, तब्बल अर्धा तास उलटून गेला तरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर वेळ वाया न घालवता स्थानिकांनी ऋषभला दुचाकीवर बसवून तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेतील अत्यंत हृदयद्रावक बाब म्हणजे, समुद्रात उतरलेल्या ऋषभच्या मोबाईलवर समर्थच्या आईचा फोन आला होता. ऋषभने तो फोन समर्थच्या हातात दिला. समर्थने आईशी काही वेळ संवाद साधला, फोन ठेवला आणि तो पाण्यात गेला; मात्र त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप आणि पोलिस कर्मचारी जनार्दन रेवंडकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून बेपत्ता समर्थ कर्पे याचा समुद्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT