Sindhudurg News 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मालवणच्या धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे थेट 'यूके'पर्यंत..?

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमकीचा फोन; राज ठाकरेंकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

मालवण : शहर आणि नजीकच्या ग्रामीण भागात आर्थिक प्रलोभने दाखवून हिंदू समाजातील गरीब व गरजू लोकांचे अनधिकृतपणे धर्मांतरण केले जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या अनधिकृत प्रकारांविरोधात आवाज उठवणारे मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांना थेट युनायटेड किंगडम (यूके) येथून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. "तुम्ही सुरू केलेले प्रकार तातडीने थांबवा, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील," अशी धमकी वजा सूचना समोरील व्यक्तीकडून गॅरी यांना देण्यात आली आहे. मात्र, कितीही दबाव आला तरी हे प्रकार बंद होईपर्यंत आपला सनदशीर मार्गाने लढा सुरूच राहील, असा निर्धार अन्ननसिएशन यांनी व्यक्त केला आहे.

गॅरी अन्ननसिएशन यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना एक लेखी निवेदन सादर करून मालवण शहर व तालुक्यात विशिष्ट समुदायाकडून सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींची चौकशी करण्याची मागणी केली. यात नागरिकांना आर्थिक मदत, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा किंवा इतर लाभांचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी. परवानगीशिवाय आयोजित केले जाणारे सभा, मेळावे किंवा प्रचार कार्यक्रम यांची चौकशी करण्यात यावी. अशा अनधिकृत प्रकारांमुळे मालवण परिसरातील सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

या निवेदनाची दखल घेत, पोलीस विभागामार्फत निश्चितपणे या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मनसे शिष्टमंडळाला दिली आहे. तसेच याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही देण्यात आली आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर गॅरी अन्ननसिएशन यांच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निवेदनाच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर येथून एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हॉट्स ॲप कॉल केला. "तुम्ही एका विशिष्ट समुदायाची बदनामी करत आहात. मी ह्युमन राईट्ससाठी काम करतो, तुम्ही दुसऱ्यांच्या मानवाधिकारांचे हनन करत आहात, त्यामुळे हे प्रकार बंद करा," अशी तंबी या व्यक्तीने दिली. मात्र, गॅरी यांनी अनधिकृत धर्मांतरण बंद झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेताच संबंधिताने फोन कट केला. हा प्रकार ताजा असतानाच, दोन दिवसांनी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास गॅरी यांना थेट 'यूके' वरून आंतरराष्ट्रीय फोन आला. या फोनवरून देखील मालवणातील धर्मांतराविरोधातील मोहीम तात्काळ थांबवण्याची धमकी देण्यात आल्याने या प्रकरणाचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

या सर्व धमक्यांना न जुमानता मनसे आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मनसे नेते संदीप दळवी यांच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. मालवणमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गरीब जनतेची होणारी फसवणूक थांबावी हीच आमची भूमिका आहे. कोणी कितीही आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरून दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी मनसे पाऊल मागे घेणार नाही. हा लढा अधिक तीव्र केला जाईल असे मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT