मालवणातील आठ बंगल्यांतील घरफोडीचा छडा! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : मालवणातील आठ बंगल्यांतील घरफोडीचा छडा!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी; दोन संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण तालुक्यातील कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे कडीकोयंडे उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुशील यशवंत आळावे (२२, रा. देवली-गवाणवाडी, ता. मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (४८, रा. धुरीवाडा, मालवण) अशी त्यांची नावे आहेत.

मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वा. ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वा. या कालावधीत ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी संकुलातील एकाच वेळी आठ बंगल्यांच्या दरवाजांचे कडीकोयंडे उचकटून आत प्रवेश केला होता. त्यानंतर बंगल्यांमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्याते गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच संकुलातील आठ बंगल्यांमध्ये घरफोडी झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने हाती घेतला होता. पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी समांतर तपासासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली होती.

या पथकांनी घटनास्थळावरून मिळालेली माहिती, गोपनीय माहितीचे संकलन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान सुशील आळावे आणि संतोष पांगे यांचा या घरफोडीशी संबंध असल्याचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याची उकल

या कारवाईत पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलिस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्साल्वीस, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, पोलिस अंमलदार अमर कांडर आणि सायबर विभागाच्या धनश्री परब यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या दहा दिवसांत संशयितांचा माग काढत या घरफोडी प्रकरणाची उकल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT