मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करताना लाटांच्या तडाख्यात मच्छीमारी नौका पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत दांडी येथील नौका मालक तथा मच्छीमार नेते सन्मेष सुरेश परब आणि मच्छीमार अक्षय हनुमंत राणे यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग याला स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढले. मच्छीमारी हंगामाच्या प्रारंभीच मालवण समुद्रात घडलेल्या या दुर्घटनेने किनारपट्टीवर शोककळा पसरली आहे.
दांडी येथील मच्छीमार सन्मेष परब यांनी सोमवारी सायंकाळी समुद्रात मासेमारीसाठी जाळी टाकली होती. मंगळवारी स. ६ वा.च्या सुमारास ते आपल्या नौकेतून मुलगा सुयोग आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासोबत दांडी समुद्रात जाळी काढण्यासाठी गेले होते. जाळी काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक आलेल्या मोठ्या लाटेने नौकेला जोरदार तडाखा दिला आणि नौका समुद्रात पलटी झाली. त्यावेळी नौकेतील तिघेही समुद्रात फेकले गेले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सन्मेष परब आणि अक्षय राणे समुद्रात बेपत्ता झाले.
दरम्यान, सुयोग परब याने नौकेतील डब्यांचा आधार घेतल्याने तो पाण्यावर तरंगत राहिला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांनी समुद्रात धाव घेतली. जयदेव लोणे यांच्या नौकेच्या मदतीने सुयोग परब याला समुद्रातून सुखरूप बाहेर काढले. दुर्घटनेनंतर काही वेळाने सन्मेष परब आणि अक्षय राणे यांचे मृतदेह मच्छीमारांना समुद्रात आढळून आले. दोन्ही मृतदेह किनाऱ्यावर आणल्यानंतर शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, तात्या धुरी, नगरसेवक ललित चव्हाण,यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मच्छीमार बांधवांनी किनाऱ्यावर आणि रुग्णालयात धाव घेतली.
राजकीय नेता गेल्याने हळहळ
मालवण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी दांडी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली. सन्मेष परब हे पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पारंपरिक मच्छीमारांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलने आणि उपोषणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. राजकीय क्षेत्रातही सन्मेष परब सक्रिय होते. पूर्वी उबाठा शिवसेनेत कार्यरत असलेले परब अलीकडे भाजपमध्ये सक्रिय झाले होते. सध्या ते भाजपा मालवण शहर मंडल उपाध्यक्षपदी कार्यरत होते. मालवणच्या माजी नगरसेविका सेजल परब यांचे ते पती होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने दांडीसह मालवणच्या सामाजिक, राजकीय आणि मच्छीमार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.