मालवण : धुरीवाडा परिसरामध्ये रस्त्यांच्या दोन्ही साईडने साचलेला कचरा आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्येची दखल घेत मालवण पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी प्रशासकीय ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर तातडीने कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छ करून घेत नागरिकांना दिलासा दिला.
सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पूनम चव्हाण यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून लोकहिताच्या कामांना सुरुवात केली आहे. धुरीवाडा येथे कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी स्थानिक नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसराचा दौरा केला.या धडक मोहिमेमुळे धुरीवाडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे बेशिस्त कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.