मालवण : मालवण हा खा. नारायण राणे यांचा मतदारसंघ आहे. जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे अस्तित्व देखील खा. राणे आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच निर्माण झाले आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षाने एक पाऊल मागे घ्यावे आणि 16-4 हा फॉर्म्युला स्वीकारत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत सामील व्हावे, असे आवाहन भाजप शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शिवसेनेला पत्रकार परिषदेत केले. हॉटेल महाराजा येथे आयोजित या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मंदार केणी, बाबा परब, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, खा. नारायण राणे यांनी जाहीर केले होते, जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष भाजपचे असतील. याच भूमिकेनुसार मालवण नगरपरिषदेचा नगराध्यक्ष देखील भाजपचाच असला पाहिजे आणि पक्षाचे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी महायुती संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान शिंदे सेनेने12 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपला असावा अशी मागणी केली होती, तर भाजपने मित्र पक्षाचा सन्मान राखून शिंदे सेनेला 4 जागा आणि नगराध्यक्षपद भाजपचा असा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. गेल्या 25 वर्षांचा इतिहास पाहता नारायण राणे यांनी मित्रपक्षाला दोनपेक्षा जास्त जागा दिल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा हा फॉर्म्युला यापुढेही जिल्ह्यात असावा, अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. शिंदे शिवसेनेकडे सध्या मालवणमध्ये शून्य नगरसेवक असतानाही भाजपने चार जागा देण्याची तयारी दाखवली आहे. भाजपच्या कोअर कमिटीने शिंदे शिवसेनेसोबत युतीमधील संघनात्मक अडचणी ठळकपणे समोर आणताना गेल्या वर्षभरात आमदार निधी आणि खासदार निधीच्या वाटपामध्ये युतीचा धर्म पाळला नाही. विकासकामांमध्ये भाजपला सन्मानाची अपेक्षा पूर्ण झाली नाही, असे श्री. मोंडकर यांनी स्पष्ट केले.
महायुतीच्या चर्चेत गुंता कायम असला तरी भाजपने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. पक्षाकडे नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 52 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 8 अर्ज प्राप्त झाले. अशा स्थितीत मित्र पक्षाला विश्वासात घेऊन भाजपला नगराध्यक्ष व 16 जागा तर शिंदे शिवसेनेला 4 जागा देण्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. यात सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नीतेश राणे, संयोजक माजी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत 60 जणांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. खा. नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खासदार राणे यांचा सन्मान राखला जावा यासाठी मित्र पक्ष शिंदे शिवसेनेने 16-4 चा फॉर्म्युला स्वीकारत महायुतीत सहभागी व्हावे असे आवाहनही श्री. मोंडकर यांनी केले.
शहरातील चिवला बीच येथे घडलेल्या घटनेमुळे ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. मालवण शहर सांघिक दृष्ट्या प्रत्येक समाजबांधवांमध्ये गुंतलेले असून आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. समाजात दुफळी निर्माण करण्याचा किंवा तेढ पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर असे कृत्य करून कोणालाही यश मिळणार नाही, असे स्पष्ट मत श्री. मोंडकर यांनी व्यक्त केले. भाजप पदाधिकार्यांनी या घटनेची माहिती राज्याच्या यंत्रणेला दिली असून पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील चर्चा केली आहे.