सावंतवाडी ःमाजगाव येथे दत्त मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री9.15 वा. च्या सुमारास गवा रेड्याच्या धडकेने एक रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक आनंद परुळेकर (रा.मळेवाड) किरकोळ जखमी झाले असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. आनंद परुळेकर हे रिक्षातून सावंतवाडीहून मळेवाडकडे जात होते. माजगाव दत्त मंदिराच्या जवळ असताना अचानक एका गवा रेड्याने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि काही प्रवासी त्वरित घटनास्थळी धावले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत आनंद परुळेकर यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजगाव परिसरात गवा रेड्यांचे रस्त्यावर अचानक येण्याचे प्रमाण वाढले आहे.
अनेकदा हे गवे कळपाने फिरताना दिसतात, त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन्य प्राणी रस्ता ओलांडताना वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.