सिंधुदुर्ग : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत निर्माण झालेल्या संघर्षानंतर सोमवारी महायुतीचे नेते सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी भवनामधील सभागृहात एकत्र आले होते. वेळागर येथील ताज प्रकल्प, वाळू उत्खननाचा मुद्दा आणि लाकूड व्यवसाय अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.
पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि आमदार नीलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, दत्ता सामंत, संजय आग्रे असे सगळेच नेते कॅमेऱ्याच्या एकाच फ्रेममध्ये आले होते. पत्रकारांशी बोलतानाही हे सर्वजण एकत्र दिसले. या बैठकांच्या निमित्ताने जिल्हाधिकारी भवनात मात्र तुडुंब गर्दी उसळली होती.
नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत सुरू झाली होती. मात्र नंतर आरोप-प्रत्यारोपांनी भरलेल्या या निवडणुकीत दोन्ही मित्रपक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. हा संघर्ष महाराष्ट्रात गाजला होता. या निवडणुकीत प्रचारादरम्यान मंत्री नितेश राणे आणि आ.निलेश राणे हे आमने-सामने आले होते. याचीही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात झाली होती. परंतु या निवडणुकीत महायुतीला यश मिळाले होते. निकालानंतर हळूहळू वातावरण निवळले आणि सोमवारी हे सर्वच नेते अनेक दिवसानंतर एकत्र आले.
पालकमंत्री नितेश राणे निवडणूक निकालानंतर मुंबईकडे गेले होते. त्यानंतर सोमवारी त्यांचा जिल्हा दौरा होता. 1 वा.च्या सुमारास पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सुरूवातीला त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी उपस्थित होते. इकडे बैठक सुरू असतानाच सभागृहाबाहेर आणि जिल्हाधिकारी भवनामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. वेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्प सध्या गाजत आहे. या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली असून पालकमंत्री नितेश राणे यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठीची जागा संपादीत केली आहे त्या जागेपैकी गावठण क्षेत्र वगळावे अशी मागणी पुन्हा एकदा तेथील लोकांनी केली आहे. या लोकांना घेवून माजी आमदार राजन तेली, जयप्रकाश चमणकर आणि इतर नेते आले होते.
वाळू उत्खननासाठी सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. वाळू व्यवसायिकांनी यापूर्वीच वाळू परवाने द्यावे अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासाठी 25 डिसेंबर हे डेडलाईन दिली होती. सोमवारी वाळू व्यवसायिक आ.निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हेही उपस्थित होते. दरम्यान आ.निलेश राणे यांच्या स्वागतासाठीही जिल्हाधिकारी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी होती. त्याचवेळी आ.दीपक केसरकर हेदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. हे सर्व नेते नंतर सभागृहात प्रवेशले. पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर या सर्व नेत्यांनी वाळू व्यवसायिक आणि वेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्प यावर चर्चा केली. इतर अनेक प्रश्नांवरही चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीतील संघर्षानंतर सर्व नेते मंडळी एकत्र आले होती. निवडणुकीत जरी संघर्ष झाला तरी यापुढे महायुती एकत्रच आहे, असा संदेश या एकत्र येण्यातून बाहेर आला अशी चर्चा सुरू होती. बैठक संपल्यानंतर हे सर्वच नेते पत्रकारांना एकत्रच सामोरे गेले. इतर कोणत्याही राजकीय विषयांवर बोलण्यास नकार देत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढत आहे आणि त्यामध्ये आम्ही यश मिळवू असे यावेळी जाहीर केले.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे अभिनंदन
जिल्हाधिकारी भवनात कार्यकर्ते आणि लोकांची गर्दी उसळली असतानाच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे तिथे आगमन झाले. कणकवलीतील विजयानंतर संदेश पारकर यांनी सर्वांचे लक्ष वेधुन घेतलेच होते. सोमवारी ते जिल्हाधिकारी भवनात आल्यानंतर अनेकजण त्यांना भेटून त्यांचे अभिनंदन करत होते. कणकवली शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करून तसे पत्र देण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते.